फतुल्लाह : भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात जोरदार पावसामुळे गुरुवारी दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आला. भारताने बुधवारी पहिल्या दिवसअखेर ५६ षटकांत बिनबाद २३९ धावांची मजल मारली होती. शिखर धवन (१५०) व मुरली विजय (८९) खेळपट्टीवर होते. हवामान खात्याचा अंदाज बघता आगामी तीन दिवस खेळ होण्याची शक्यता धूसर भासत आहे. त्यामुळे भारताला प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेणे व सामन्यात निकालाची शक्यता निर्माण करण्याची संधी मिळणे कठीण भासत आहे. पूर्णकालिक कर्णधार म्हणून प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करीत असलेल्या विराट कोहलीसाठी ही निराशाजनक बाब आहे. बांगलादेशने प्रथमच जून महिन्यात कसोटी सामन्याचे आयोजन केले आहे, हे विशेष. वृत्तसंस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार या सामन्यासह आतापर्यंत बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या ५० कसोटी सामन्यांपैकी एकही लढत जून, जुलै, आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात खेळली गेलेली नाही. हा कालावधी मॉन्सूनचा असतो. भारताने आतापर्यंत येथे खेळलेले सात सामने नोव्हेंबर (२०००), डिसेंबर (२००४) आणि जानेवारी (२०१०) या कालावधीत झालेले आहेत. या छोटेखानी मालिकेला पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बांगलादेश वन-डे संघाचा कर्णधार मशरफी मूर्तझाने अलीकडेच केलेल्या चर्चेदरम्यान अशी शंका व्यक्त केली होती. मशरफीने सांगितले, ‘‘उभय संघांना प्रत्येकी ५० षटके खेळण्याची संधी मिळावी आणि पावसाचा व्यत्यय निर्माण होऊ नये, अशी प्रार्थना करतो. पावसाबाबत शक्यता वर्तविणे कठीण आहे.’’(वृत्तसंस्था)
दुसऱ्या दिवशीचा खेळ पाण्यात
By admin | Updated: June 12, 2015 03:47 IST