न्यूझीलंडचे इंग्लंडला विक्रमी टार्गेट
By Admin | Updated: June 2, 2015 01:04 IST2015-06-02T01:04:34+5:302015-06-02T01:04:34+5:30
बी. जे. वॉटलिंगच्या शतकानंतर तळातील फलंदाजांनी केलेल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी

न्यूझीलंडचे इंग्लंडला विक्रमी टार्गेट
लीडस : बी. जे. वॉटलिंगच्या शतकानंतर तळातील फलंदाजांनी केलेल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ४५५ धावांचे विक्रमी लक्ष्य दिले आहे.
न्यूझीलंडने आज ६ बाद ३३८ धावांवरुन पुढे खेळताना फक्त १६ षटकांत ११६ धावा करुन संघाची धावसंख्या ८ बाद ४५४ पर्यंत पोहचविली. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने आपला डाव घोषित केला. इंग्लंडला ४५५ धावांचे लक्ष्य देण्यात आले. पहिल्या डावात दोन्ही संघांनी ३५0 धावा केल्या होत्या. त्यामुळे कोणालाच आघाडी मिळाली नव्हती.
चौथ्या डावात कसोटी जिंकण्यासाठी सर्वाधिक ४१८ धावांचा पाठलाग वेस्ट इंडिजने यशस्वीपणे केला आहे. त्यांनी २00२-0३ मध्ये अँटिग्वा कसोटीत आॅस्ट्रेलियाविरुध्द ही कामगिरी केली होती. इंग्लंडने ३३२ धावांचा यशस्वी पाठलाग १९२८-२९ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुध्द केला होता.
न्यूझीलंडच्या टार्गेटचा पाठलाग करताना उपहारापर्यंत इंग्लंडने बिनबाद ३२ धावा केल्या होत्या. अॅडम लिथ आणि कर्णधार अॅलिस्टर कुक दोघेही १५-१५ धावा करुन खेळत होते.
तत्पूर्वी, आज सकाळी वॉटलिंगने कालच्या नाबाद १00 धावांवरुन पुढे खेळताना २0 धावांची भर घातली. जेम्स अॅडरसनच्या गोलंदाजीवर तिसऱ्या स्लीपमधील ज्यो रुटकडे झेल देवून तो बाद झाला. त्याने १६३ चेंडूच्या खेळीत १५ चौकार आणि एक षटकार मारला. यानंतर मार्क क्रेग (५८) आणि टीम साउथी (४0) यांनी केलेल्या टि-२0 स्टाईल फटकेबाजीमुळे न्यूझीलंडला इंग्लंडवर मोठी आघाडी घेता आली.
इंग्लंडकडून मार्क वूडने ३ तर अँडरसन आणि ब्रॉड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.(वृत्तसंस्था)