न्यूझीलंडची द. आफ्रिकेला‘ धोबीपछाड’
By Admin | Updated: February 12, 2015 02:09 IST2015-02-12T02:09:24+5:302015-02-12T02:09:24+5:30
ट्रेंट बोल्टने ५१ धावा देत घेतलेले पाच बळी आणि त्याआधी सांघिक केलेल्या फलंदाजीच्या बळावर बुधवारी विश्वचषकाच्या सराव सामन्यात न्यूझीलंडने द. आफ्रिकेला तब्बल

न्यूझीलंडची द. आफ्रिकेला‘ धोबीपछाड’
ख्राईस्टचर्च : ट्रेंट बोल्टने ५१ धावा देत घेतलेले पाच बळी आणि त्याआधी सांघिक केलेल्या फलंदाजीच्या बळावर बुधवारी विश्वचषकाच्या सराव सामन्यात न्यूझीलंडने द. आफ्रिकेला तब्बल १३४ धावांनी पराभवाचा धक्का दिला.
घरच्या मैदानावर बलाढ्य मानल्या जाणाऱ्या न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेताच ५० षटकांत ८ बाद ३३१ धावा उभारल्या. नंतर गोलंदाजांच्या बळावर आफ्रिकेची झुंज ४४.२ षटकांत १९७ अशी मोडीत काढली. या विजयात सांघिक कामगिरी, तसेच बोल्टची गोलंदाजी निर्णायक ठरली. त्याने ९.२ षटकांत ५१ धावा देत अर्धा संघ बाद केला. अनुभवी डॅनियल व्हेट्टोरी, मिशेल मॅक्लेगन यांनी प्रत्येकी दोन व टिम साऊदी याने एक बळी घेतला. फलंदाजीत न्यूझीलंडकडून कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम ५९, केन विलियम्सन ६६, रॉस टेलर ४१ आणि नाथन मॅक्यूलम नाबाद ३३ यांनी योगदान दिले. द. आफ्रिकेचे गोलंदाज व्हर्नोन फिलॅण्डर, काईल एबोट आणि व्हेन पार्नेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
विजयाचा पाठलाग करणाऱ्या द. आफ्रिकेचे सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.
जेपी डुमिनी याने ९८ चेंडूंत आठ चौकारांसह सर्वाधिक ८० आणि आठव्या स्थानावर आलेल्या फिलॅण्डरने ५७ धावा ठोकल्यामुळे संघाला शंभरचा आकडा गाठता आला. कर्णधार एबी डिव्हिलियर्स जखमेतून सावरल्यानंतर खेळायला आला. त्याने २८ चेंडू खेळून २४ धावा केल्या. (वृत्तसंस्था)