न्यूझीलंडवर पराभवाचे सावट
By Admin | Updated: November 29, 2015 01:35 IST2015-11-29T01:35:01+5:302015-11-29T01:35:01+5:30
फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाईट तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड संघ पराभवाच्या छायेत अडकला. पहिल्या डावात २२ धावांनी

न्यूझीलंडवर पराभवाचे सावट
अॅडिलेड : फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाईट तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड संघ पराभवाच्या छायेत अडकला. पहिल्या डावात २२ धावांनी माघारल्यानंतर खेळ संपेपर्यंत ११६ धावांत अर्धा संघ गमविणाऱ्या न्यूझीलंडकडे एकूण आघाडी केवळ ९४ धावांची असून पाच फलंदाज शिल्लक असल्याने तिसऱ्या दिवसअखेर सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली.
बीजे वाटलिंग ७ आणि मिशेल सेंटनर १३ हे नाबाद होते. गुलाबी चेंडू पुन्हा एकदा फलंदाजांवर वरचढ ठरला. जोश हेजलवुड याने विद्युत प्रकाशझोताचा लाभ घेत दोन्ही सलामीवीरांना तंबूची वाट दाखविली. मार्टिन गुप्तिल १७ याने मिशेल मार्शकडे झेल दिला, तर टॉम लेथम (१०) यष्टीमागे झेलबाद झाला. केन विलियम्सन याला हेजलवुडच्या चेंडूवर जीवदान मिळाले, पण तो लाभ घेण्यात अपयशी ठरला. मार्शच्या चेंडूवर यष्टिरक्षक पीटर नेव्हिले याने त्याला झेलबाद केले. कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम २० याला मार्शने पायचित केले. पर्थमध्ये द्विशतक ठोकणारा रॉस टेलर ३२ याला हेजलवुडने तंबूची वाट दाखविली.
त्याआधी आॅस्ट्रेलियाचा डाव २२४ धावांत संपल्याने २२ धावांची आघाडी घेता आली. एकवेळ ११८ धावांत संघाचे आठ फलंदाज तंबूत परतले होते, पण नाथन लियॉन याला हॉट स्पॉटमध्ये पंचाने नाबाद ठरविले. लियॉनने याचा लाभ घेत नेव्हिलेसोबत नवव्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली.
लियॉनने ३४ धावांचे योगदान दिले.पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतरही अखेरच्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या स्टार्कने लागोपाठ दोन षट्कार हाणले. तो २४ धावा काढून नाबाद राहिला. नेव्हिलेने सर्वोच्च ६६ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून डग ब्रेसवेल याने १८ धावांत तीन आणि ट्रेंट बोल्ट व क्रेग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
धा व फ ल क
न्यूझीलंड पहिला डाव २०२.
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ब्रुन्स त्रि. गो. ब्रॅकवेल १४, डेव्हीड वॉर्नर झे. साऊथी गो. बोल्ट १, स्मिथ झे. वॉल्टींग गो. क्रेग ५३, वोगस झे. गुप्टील गो. साऊथी १३, एस. ई. मार्श धावबाद (मॅक्युलम) २, एम. आर. मार्श झे. वॉल्टींग गो. ब्रॅकवेल ४, नेविल झे. स्नटनर झे. ब्रेकवेल ६६, सिडले झे. लॅथम गो. क्रे ग 0, हेजलवूड त्रि.गो. स्नटनर ४, लॉओन जेल विल्यमसन गो. बोल्ट ३४, स्ट्रॉस नाबाद २४. अवांतर (९). एकूण ७२.१ षटकांत सर्वबाद २२४.
गोलंदाजी : साऊथी १७-१-५०-१, बोल्ट १७-५-४१-२, ब्रेकवेल १२.१-३-१८-३, स्नटनर १६-१-५४-१, क्रेग १०-१-५३-२.
न्यूझीलंड दुसरा डाव : लॅथम झे. नेविल गो. हेजलवूड १०, गुप्टील झे. मार्श गो. हेजलवूड १७, विल्यमसन झे. नेविल गो. मार्श ९, टेलर पायचित गो. हेजलवूड ३२, मॅक्युलम पायचित गो. मार्श २०, स्नटनर खेळत आहे १३, बी. जे. वॉटलिंग खेळत आहे ७. अवांतर (८). एकूण ३७ षटकांत ५ बाद ११६. गोलंदाजी : हेजलवूड १६-५-३२-३, सिडल १०-४-२२-०, मार्श ८-०-४४-२, लियॉन ३-०-१०-०.