नवी सम्राज्ञी

By Admin | Updated: January 31, 2016 03:14 IST2016-01-31T03:14:02+5:302016-01-31T03:14:02+5:30

जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने धडाकेबाज प्रदर्शन करीत जागतिक नंबर वनची खेळाडू गत चॅम्पियन सेरेना विल्यम्सचे साम्राज्य उद्ध्वस्त करीत आॅस्ट्रेलियन ओपनची नवी सम्राज्ञी

New Empress | नवी सम्राज्ञी

नवी सम्राज्ञी

मेलबोर्न : जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने धडाकेबाज प्रदर्शन करीत जागतिक नंबर वनची खेळाडू गत चॅम्पियन सेरेना विल्यम्सचे साम्राज्य उद्ध्वस्त करीत आॅस्ट्रेलियन ओपनची नवी सम्राज्ञी होण्याचा मान मिळाला.
सातव्या मानांकित केर्बरने अग्रमानांकित सेरेनाला दोन तास आठ मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात ६-४, ३-६, ६-४ असे हरवून वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले. केर्बरच्या विजयामुळे सेरेनाच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदाशी बरोबरी करण्याचे स्वप्नाचा चुराडा झाला. सेरेनाला गेल्या वर्षी यूएस ओपनमध्येही अपयशाचा सामना करावा लागला होता. या वर्षीची तिची सुरुवातही निराशेनेच झाली. केर्बरचे सेरेनासोबत करिअर रेकॉर्ड १-५ असे होते, पण जर्मन खेळाडूने आज सगळे हिशेब एकत्रित चुकते करताना नवीन इतिहास रचला. विजेतेपदाच्या आनंदाने केर्बरने उडी मारली. सेरेनानेही तिचे अभिनंदन केले. ओपन युगात ग्रँडस्लॅम जिंकणारी स्टेफी ग्राफनंतर केर्बर दुसरी जर्मन खेळाडू बनली आहे. स्टेफीनंतर १७ वर्षे जर्मनीत ग्रँडस्लॅम विजेता घडला नव्हता ती कसर केर्बरने भरून काढली.

दोन तासांचा संघर्ष....
१ सेट पहिला : केर्बरने सेरेनाच्या चुकीचा पुरेपूर फायदा उठवला. तिने सेरेनाची सर्व्हिस दोन वेळा तोडताना ३९ मिनिटांतच हा सेट जिंकला.
२ सेट दुसरा : सेरेनाने आपल्या चुकांवर नियंत्रण ठेवत सामन्यात पुनरागमन करताना ३३ मिनिटांत हा सेट जिंकला.
३ तिसरा सेट : सामन्यात बरोबरी झाल्याने आपला अनुभव पणाला लावून सेरेना २२ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या दृष्टीने आगेकूच करील, असे वाटत होते. या उलट केर्बरकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते. तिने आपले सर्वस्व पणाला लावून ५-३ अशी आघाडी घेतली. सेरेनाने शेवटची धडपड करताना ४-५ असे अंतर कमी केले. परंतु दहावा गेम जिंकून हा निर्णायक सेट केर्बरने ६-४ असा आपल्या नावावर जिंकून इतिहास घडविला.


सरेनाचे ग्रँडस्लॅम फायनल रेकॉर्ड २१-४ असे राहिले आहे. २००१ च्या यूएस ओपन आणि २००८ च्या विम्बल्डन फायनलमध्ये आपली व्हीनसकडून हरली होती.
२००४ च्या विम्बल्डनमध्ये मारिया शारापोव्हा, तर २०११च्या यूएस ओपनमध्ये सामंथा स्तोसूर यांनी सेरेनाला हरवून विजेतेपद पटकावले होते. आज तिला २०१६ च्या आॅस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये केर्बरने तिला हरवून तिचे ग्रँडस्लॅम रेकॉर्ड २१-५ असे केले.

केर्बरसाठी मी आनंदित आहेत. तिने खरोखरच चांगला खेळ केला. माझी कामगिरीही चांगलीच झाली. प्रत्येक सामना मी जिंकू शकत नाही, कारण मी रोबोट नाही.
- सेरेना विल्यम्स

मी आतापर्यंत खूप परिश्रम केले आहेत, म्हणून मी आज येथे आहे. आता मी ग्रँडस्लॅम चॅम्पियन आहे, असे अभिमानाने सांगू शकते. हे दोन आठवडे माझ्या आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय आठवडे ठरले आहेत.
- एंजेलिक केर्बर

Web Title: New Empress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.