श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मिळणार नवा प्रशिक्षक
By Admin | Updated: June 21, 2017 20:48 IST2017-06-21T18:33:23+5:302017-06-21T20:48:18+5:30
अनिल कुंबळेने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या

श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मिळणार नवा प्रशिक्षक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - अनिल कुंबळेने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल, अशी माहिती बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी दिली आहे. कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या मतभेदांनंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे याने काल आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
याबाबत माहिती देताना राजीव शुक्ला म्हणाले, " श्रीलंका दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत राजीनामा दिल्यावर मंडळाने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी संघाला नवा प्रशिक्षक मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. तसेच संघासाठी आम्ही सर्वोत्तम प्रशिक्षकाचा शोध घेऊ."
प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी बीसीसीआयने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर अनिल कुंबळे याने पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शुक्ला यांनी दिली.
काल संध्याकाळी अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. कुंबळे प्रशिक्षक म्हणून यशस्वी ठरला असता, तरी त्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत चांगले संबंध राखता आले नव्हते. अखेर परिस्थिती चिघळल्यावर त्याने संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला.
कुंबळेने पद सोडताना कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केले होते. भारतीय संघाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप होता. आमच्यामधील भागीदारी अस्थायी होती, असा आरोप कुंबळेने पायउतार होताना केला. फेसबुक आणि ट्विटरवर एक पोस्ट करत जंबोने आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली होती.
Team India will get new head coach before Sri Lanka tour: BCCI
— ANI Digital (@ani_digital) June 21, 2017
Read @ANI_news story ->https://t.co/ghoSmNXi9spic.twitter.com/TaFzoGgJwB