मुंबई : डावखुरा फिरकी गोलंदाज हेमंत बुछाडे (३/१३) याच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर निरलॉन संघाने देना बँकेचे तगडे आव्हान १६ धावांनी परतावून लावले आणि आरसीएफ कॉर्पोरेट्स टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी त्यांच्यासमोर बलाढ्य भारतीय नौदलाचे आव्हान असेल.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या निरलॉन संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १७६ अशी मजल मारली. अंकित शास्त्री (६१) आणि सौरभ सिंग (३४) यांनी फटकेबाजी करताना संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या देना बँकेला फायदा उचलता आला नाही. निरलॉनच्या गोलंदाजांनी अचूक मारा करताना देना बँकेच्या फलंदाजांना नंतर जखडवून ठेवले. यामुळे बँकेच्या फलंदाजांकडून चुका होऊ लागल्या. निखिल जाधव याने देना बँकेकडून सर्वाधिक ४५ धावांची खेळी करताना संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. मात्र अखेर देना बँकेचा डाव ९ बाद १६० असा रोखताना निरलॉनने निर्णायक विजयासह अंतिम फेरीत धडक मारली. (क्रीडा प्रतिनिधी)
कॉर्पोरेट टी-२० स्पर्धेत निरलॉन अंतिम फेरीत
By admin | Updated: February 25, 2015 05:03 IST