भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) याने शुक्रवारी मध्यरात्री आणखी एक पराक्रम केला. त्याने सलग दुसऱ्यांदा डायमंड लीग जिंकली. नीरजने पाचव्या प्रयत्नात ८७.६६ मीटर भालाफेक करून ही लीग जिंकली. त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते आणि त्याने त्याच्या कामगिरीत आज सुधारणा करून भाला आणखी दूर फेकला.
नीरजला पहिल्या प्रयत्नात फार चांगली कामगिरी करता आली नाही आणि दुसऱ्या प्रयत्नात तो केवळ ८३.५२ मीटर लांब भालाफेकू शकला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने कामगिरी सुधारली अन् ८५.०४ मीटर लांब भालाफेक केली. चौथ्या प्रयत्नात पुन्हा त्याच्याकडून फाऊल झाला. पण, पाचव्या प्रयत्नात त्याने ८७.६६ मीटर लांब भाला फेकून लीगवर कब्जा केला. जर्मनीच्या ज्युलियन वेबरकडून नीरजला कडवी टक्कर मिळाली. वेबरने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ८६.२० मीटर लांब भाला फेकला होता आणि त्यानंतर शेवटच्या प्रयत्नात त्याचा ८७.०३ मीटर लांब पोहोचला.
मागच्या वर्षी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले आणि ल्युसाने डायमंड लीगमध्ये ८९.०८ मीटर भालाफेक करून डायमंड लीग फायनलमधील जागा पक्की केली होती. सप्टेंबरमध्ये झ्युरिच येथे झालेल्या फायनलमध्ये त्याने ८८.४४ मीटरसह बाजी मारली अन् ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.