नीरज चोप्राचा टी-शर्ट जागतिक अॅथलेटिक्सच्या वारसा संग्रहालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 12:06 IST2024-12-15T12:06:10+5:302024-12-15T12:06:54+5:30
जागतिक अॅथलेटिक्स संग्रहालयाच्या ऑनलाइन थ्रीडी प्लॅटफॉर्मवर ही कलाकृती प्रदर्शित करण्यात आली आहे.

नीरज चोप्राचा टी-शर्ट जागतिक अॅथलेटिक्सच्या वारसा संग्रहालयात
मोनाको : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा टी- शर्ट जागतिक अॅथलेटिक्सच्या वारसा संग्रहालयात (एमओडब्ल्यूए) समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे नीरजने जगातील प्राख्यात २३ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. जागतिक अॅथलेटिक्स संग्रहालयाच्या ऑनलाइन थ्रीडी प्लॅटफॉर्मवर ही कलाकृती प्रदर्शित करण्यात आली आहे.
टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये अॅथलेटिक्समधील भारताला पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ठरलेल्या चोप्राने यावर्षी पॅरिसमध्ये स्पर्धेत परिधान केलेला टी-शर्ट दान केला होता. चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटर दूर भाला फेकताना पाकिस्तानच्या अर्शद नदीम (९२.९७ मी.) याच्यानंतर दुसरे स्थान मिळवले होते.
चोप्राशिवाय युक्रेनच्या यारोस्लावा महुचिख आणि तिची साथी पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती थिया लाफॉन्ड यांच्याही स्पर्धा कलाकृती या वारसा संग्रहालयात समाविष्ट आहेत. जागतिक अॅथलेटिक्सचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी स्पर्धेतील वस्तू आणि पदके दान केल्याबद्दल खेळाडूंचे कौतुक केले.