नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांनी अलीकडे उत्कृष्ट कामगिरी केली नसली, तरी नवनियुक्त कोच युक्रेनचे ओलेग मिखाईलोव्ह यांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांमध्ये भारतीय खेळाडू सरस आहेत. केवळ त्यांचे तंत्र सुधारण्याची गरज आहे.रिओ आॅलिम्पिकदरम्यान मिखाईलोव्ह यांनी ब्राझीलच्या पिस्तूल संघाला कोचिंग दिले. सध्या त्यांनी संजीव राजपूत आणि तेजस्विनी सावंत यांना दहा दिवस मार्गदर्शन केले. इतका कमी वेळ कोचिंगसाठी उपयुक्त नसला तरी मी रोमांचित झालो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.मिखाईलोव्ह पुढे म्हणाले, ‘मी येथे दहा दिवसांपासून आहे. भारतीय संघ फार बलाढ्य आहे इतकेच सांगू शकतो. या संघात दिग्गज नेमबाज आहेत. केवळ या खेळाडूंचे तंत्र सुधारण्याची गरज आहे. मला येथे शून्यापासून सुरुवात करण्याची गरज नाही. हे खेळाडू जगात सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील इतकेच मी आश्वस्त करू इच्छितो.’ डॉ. कर्णिसिंग शूटिंग रेंजवर विश्वचषकाच्या तयारीत भारतीय संघ व्यस्त आहे. या संघाला मिखाईलोव्ह मार्गदर्शन करीत असताना खेळाडू त्यांचा सल्ला ऐकण्यात तल्लीन होते. भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. घरच्या प्रेक्षकांपुढे नेमबाजांवर अधिक दबाव असेल, असे नव्या कोचचे मत आहे. ते पुढे म्हणाले, ‘मायदेशात नेमबाजांवर स्थानिक चाहत्यांचा दबाव असतो. त्यामुळे कामगिरी खालावण्याची देखील भीती असते.’विश्वचषकाचे भारतात आयोजन पहिल्यांदा होत असल्याने अनुभवाची उणीव आहे. रेंज सज्ज नसल्यामुळे नेमबाजांना सरावाची पुरेशी संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. भविष्यातील स्पर्धांची तयारी फार पूर्वी व्हायला हवी, असे मिखाईल यांचे मत होते. (वृत्तसंस्था)
नेमबाजांचे तंत्र सुधारण्याची गरज -कोच मिखाईलोव्ह
By admin | Updated: February 23, 2017 01:00 IST