यष्टीवर मारा करणे आवश्यक : हेजलवूड
By Admin | Updated: March 7, 2017 00:39 IST2017-03-07T00:39:15+5:302017-03-07T00:39:15+5:30
आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या मते दुसऱ्या कसोटी सामन्यात पुढील दोन दिवस वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात

यष्टीवर मारा करणे आवश्यक : हेजलवूड
बेंगळुरू : आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या मते दुसऱ्या कसोटी सामन्यात पुढील दोन दिवस वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. चौथ्या दिवशी भारताचा डाव झटपट गुंडाळण्यासाठी यष्टीवर मारा करण्यावर भर देणार असल्याचे हेजलवूडने स्पष्ट केले.
भारताने या कसोटीत दुसऱ्या डावात ४ बाद २१५ धावांची मजल मारली असून, १२६ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना हेजलवूड म्हणाला, ‘या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज बराच बाहेर मारा करीत आहे. खेळपट्टीवर असमान उसळी मिळत असून काही चेंडू अधिक उसळत आहेत.
यष्टीवर सरळ मारा करणे आवश्यक आहे. फिरकीपटूंनी चांगला मारा केला. आम्ही मंगळवारी चांगला मारा करीत पुनरागमन करण्यात यशस्वी ठरू, असा विश्वास आहे.’
हेजलवूड म्हणाला, की मायदेशात खेळताना गोलंदाजांना उजव्या यष्टीबाहेर मारा करण्याची सवय आहे. त्यामुळे बॅटची कड घेऊन फलंदाजाला झेलचित करण्याची संधी असते, पण येथे भारतात मात्र पायचित करण्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे.
दरम्यान, हेजलवूडने भारतीय वेगवान गोलंदाजांची प्रशंसा केली. हेजलवूड म्हणाला, ‘येथे चेंडू फार स्विंग किंवा रिव्हर्स स्विंग होत नाही. त्यामुळे सोपी रणनीती अमलात आणावी लागते. पण बरेचदा असा मारा करणे अडचणीचे ठरते. भारतीय गोलंदाजांनी रविवारी बराच वेळ चांगला मारा केला. आम्हाला आज आणखी सुधारणा करण्याची संधी होती. ’
हेजलवूडने चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांचीही प्रशंसा केली. यांच्या कामगिरीमुळे भारताला या कसोटीत पुनरागमन करता आले. सध्या या कसोटीत उभय संघांना समान संधी आहे, असेही त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)