भारतीय पंचांना ‘शिकवणी’ची गरज : के़ हरिहरन

By Admin | Updated: April 17, 2017 01:17 IST2017-04-17T01:17:31+5:302017-04-17T01:17:31+5:30

भारतीय पंचांच्या कामगिरीचा दर्जा खालावत चालला आहे, आयपीएलमध्ये पंचांकडून होणाऱ्या चुकांमुळे त्या सर्वांच्या नजरेत येत आहेत

Need of 'Education' for Indian umpires: K Hariharan | भारतीय पंचांना ‘शिकवणी’ची गरज : के़ हरिहरन

भारतीय पंचांना ‘शिकवणी’ची गरज : के़ हरिहरन

नवी दिल्ली : भारतीय पंचांच्या कामगिरीचा दर्जा खालावत चालला आहे, आयपीएलमध्ये पंचांकडून होणाऱ्या चुकांमुळे त्या सर्वांच्या नजरेत येत आहेत. यावर उपाय म्हणून भारतीय पंचांच्या कामगिरीचे मूल्यमापन त्यावर मार्गदर्शन करणारी व्यवस्था उभारण्याची गरज माजी आंतरराष्ट्रीय पंच के़ हरिहरन यांनी व्यक्त केली.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हरिहरन यांनी म्हटले आहे, की ज्याप्रमाणे निवड समितीचे सदस्य खेळाडूंच्या कामगिरीवर नजर ठेवून असतात, तसे पंचांसाठी मेंटॉरची गरज आहे. सामन्यातील पंचांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याचे आणि सामन्यातील चुकांवर आणि कामगिरीवर पंचांना मार्गदर्शन करण्याचे काम हे मेंटॉर करतील, असे हरिहरन यांचे म्हणणे आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत पंचांकडून मोठ्या चुका झाल्या आहेत. या चुका टाळता आल्या असत्या. आयपीएलला जागतिक पातळीवर मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने या चुका ठळकपणे निदर्शनास येत आहेत. त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चाही रंगली आहे. आपल्याकडे देशांतर्गत पंचांसाठी मार्गदर्शन करणारी कार्यप्रणाली नाही. त्याचा तोटा होत आहे. हरिहरन यांनी दोन कसोटी आणि ३४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी केली असून ते बीसीसीआयच्या समीक्षा समितीचे सदस्य आहेत. पंचगिरीचा स्तर सुधारण्यासाठी वेळोवेळी बदल करण्याचा प्रस्ताव देण्याचे काम ही समिती करीत असते. पॅनेलमध्ये हरिहरन यांच्याशिवाय माजी पंच विजय चोपडा, आय. शिवराम आणि व्ही. के. रामास्वामी यांचा समावेश आहे. सध्या देशात ११० बीसीसीआय मान्यताप्राप्त पंच आहेत. हरिहरन यांनी सांगितले, की देशातील आघाडीच्या २५ पंचांसाठी मेंटॉर नियुक्तीचा प्रस्ताव आम्ही बीसीसीआयला दिला आहे. याबाबतीत आता बीसीसीआयच्या पुढाकाराची गरज आहे.


आयपीएलमधील खराब पंचगिरी...
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात १२ एप्रिलला झालेल्या सामन्याच्या पहिल्या डावातील पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात म्हणजे सहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने बुमराहला चौकार ठोकला. यानंतर नियमाप्रमाणे पुढील षटकातील पहिला चेंडू शिखर धवनने खेळणे अपेक्षित होते. परंतु, सातव्या षटकातील पहिला चेंडूदेखील वॉर्नरनेच खेळला आणि त्यावर एक धाव घेतली. विशेष म्हणजे, पंचांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा खूप उशीर झाला होता.
पंचांच्या खराब कामगिरीचा फटका मुंबई इंडियन्सच्या जोस बटलर, रोहित शर्मा यांनाही बसला. बॅटला चेंडू चाटून गेला असताना त्यांना पायचित दिले़

Web Title: Need of 'Education' for Indian umpires: K Hariharan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.