नासिर जमशेदची पीसीबीला धमकी
By Admin | Updated: May 20, 2017 03:24 IST2017-05-20T03:24:50+5:302017-05-20T03:24:50+5:30
निलंबित कसोटी फलंदाज नासिर जमशेद याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली आहे. पीसीबी आपल्याला स्पॉट फिक्सिंगमध्ये गोवण्यासाठी

नासिर जमशेदची पीसीबीला धमकी
कराची : निलंबित कसोटी फलंदाज नासिर जमशेद याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली आहे. पीसीबी आपल्याला स्पॉट फिक्सिंगमध्ये गोवण्यासाठी साक्षीदार म्हणून सहकारी खेळाडूंवर दडपण आणत असल्याचा त्याचा आरोप आहे.
पाककडून दोन कसोटी, ४८ वन डे आणि १८ टी-२० सामने खेळलेल्या जमशेदने आपण ब्रिटनमध्ये असताना इकडे मायदेशात पीसीबीने सहकारी खेळाडूंवर खोटी साक्ष देण्यासाठी दडपण आणल्याचा आरोप केला.
सोशल मीडियावरील व्हिडिओ संदेशात जमशेद म्हणाला, ‘पीसीबी माझ्यासोबत सूडभावनेने वागत आहे. बोर्डातील अधिकारी माझ्याविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी सहकारी खेळाडूंवर दडपण आणत आहेत. माझी बदनामी व्हावी, असे पीसीबीला वाटते.’
पाकिस्तान सुपर लीगमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी ज्या सहाजणांना निलंबित करण्यात आले त्यात जमशेदचा देखील समावेश होता. याप्रकरणी कायदेशीर तज्ज्ञांचा आपण सल्ला घेत असल्याचे सांगून जमशेद पुढे म्हणाला, माझ्याविरुद्ध काही साक्षीपुरावे असल्यास ते मीडियापुढे ठेवावेत असे पीसीबीला मी आव्हान देत आहे. अशा प्रकारचे तथ्यहीन आरोप माझ्या खासगी आयुष्यावर विपरीत परिणाम करणारे ठरत आहेत. (वृत्तसंस्था)
आयसीसीने पीसीबीला सावध केले होते : फ्लॅनगन
पाकिस्तान सुपर लीगमधील संभाव्य स्पॉट फिक्सिंगबाबत आपण पीसीबीचे आधीच लक्ष वेधले असल्याचा खुलासा आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख रॉनी फ्लॅनगन यांनी केला आहे.
आयसीसीच्या एसीयू पथकाने फेब्रुवारीत हा खुलासा केल्याचा दावा पाकने केला होता. याच्याविरुद्ध फ्लॅनगन यांनी लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना ब्रिटनमधील राष्ट्रीय गुन्हेविरोधी एजन्सीने दिलेल्या माहितीच्या आधारे आपण पीसीबीच्या भ्रष्टाचार पथकाला ही सूचना दिली होती.
नंतर पीसीबीने फिक्सिंगच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमली तेव्हा पीसीबीकडून साक्षीदार या नात्याने फ्लॅनगन स्वत: उपस्थित होते. ही समिती सहा खेळाडूंच्या निलंबनासोबतच स्थापन झाली. बोर्डाने याच आठवड्यात अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज याच्यावर देखील दोन महिन्यांची बंदी घातली. मागच्या वर्षीच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सट्टेबाजांनी आपल्याशी संपर्क केल्याची कबुली त्याने दिली होती.