नरसिंगने घेतली पंतप्रधानांची भेट
By Admin | Updated: August 3, 2016 04:13 IST2016-08-03T04:13:31+5:302016-08-03T04:13:31+5:30
भारतीय मल्ल नरसिंग यादवने राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) हिरवा कंदिल दिल्याच्या एक दिवसानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नरसिंगने घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली : भारतीय मल्ल नरसिंग यादवने राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) हिरवा कंदिल दिल्याच्या एक दिवसानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी नरसिंगला तणाव न बाळगता आॅलिम्पिकमध्ये भारताचे नाव उंचावण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
पंतप्रधानांनी भाजप संसदीय दलाच्या बैठकीनंतर संसद भवनामध्ये असलेल्या कार्यालयात नरसिंगची भेट घेतली. तुझ्यावर कुठला अन्याय होणार नाही, असे आश्वासन मोदी यांनी नरसिंगला यावेळी दिले.
पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर नरसिंग म्हणाला,‘पंतप्रधानांनी मला शुभेच्छा दिल्या असून तणाव न बाळगता आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास सांगितले. देशासाठी पदक पटकावण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगताना पंतप्रधानांनी माझ्यावर कुठला अन्याय होणार नसल्याचे म्हटले.’’
२५ जून रोजी झालेल्या डोप चाचणीमध्ये नरसिंग अपयशी ठरला होता. माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला, असा दावा नरसिंगने त्यावेळी केला होता. नरसिंग आता हा वाद विसरून आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रयत्नशील आहे.
नरसिंग म्हणाला, ‘‘मी पंतप्रधानांचा आभारी आहे. त्यांनी माझे समर्थन केले. मला अडचणीच्या काळात पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचा मी आभारी आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश येईल, अशी आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)