‘नारायणा’स्त्रासमोर कामिल द्रागून निष्प्रभ
By Admin | Updated: October 10, 2014 04:47 IST2014-10-10T04:47:50+5:302014-10-10T04:47:50+5:30
जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचा तिसरी फेरी ‘ड्रॉ’ने गाजल्यानंतर आज चौथ्या फेरीचा खेळ धक्कादायक निकालांनी गाजला.

‘नारायणा’स्त्रासमोर कामिल द्रागून निष्प्रभ
अमोल मचाले, पुणे
जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचा तिसरी फेरी ‘ड्रॉ’ने गाजल्यानंतर आज चौथ्या फेरीचा खेळ धक्कादायक निकालांनी गाजला. पोलंडचा ग्रॅण्डमास्टर कामिल द्रागून भारताच्या ‘नारायणा’स्त्रासमोर निष्प्रभ ठरला. मुलींच्या गटातही भारताच्या पद्मिनी राउतने इजिप्तची वूमन ग्रॅण्डमास्टर मोना खालेद हिला पराभवाचा शॉक दिला.
अहमदनगर रोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज सहाव्या पटावर झालेली द्रागून विरुद्ध नारायणन यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. या लढतीचा प्रारंभ पाहता पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणारा द्रागून बाजी मारेल, असे वाटत होते. मात्र, भारताचा इंटरनॅशनल मास्टर असलेल्या सुनीलधूत नारायणन याने अफलातून व्युहरचना आखली. प्रतिस्पर्धी आपल्यासाठी जाळे विणतोय, याची कल्पना कामिलला बहुदा उशिरा आली. ४७व्या चालीत त्याने आपला पराभव मान्य केला.
मुलींच्या गटात तिसरी मानांकित वूमन ग्रॅण्डमास्टर पद्मिनीने आज अप्रतिम चाली रचून मोना खालेदवर ४७ चालींनंतर सरशी साधली. बचावातील ‘रूय-लोपेझ’ या काहीशा दुर्लक्षित पद्धतीने पद्मिनीने प्रारंभ केला. पण, यापुढे तिने खूपच कल्पकतेने खेळ्या केल्या आणि मोनाला चुका करण्यास भाग पडले. ७ व्या चालीला वजीर डावाच्या बाहेर पडले होते आणि ४७ व्या चालीला जेव्हा मोना ने डाव सोडला तेव्हा पद्मिनी कडे एका प्याद्याची देखिल बढत नव्हती. परंतु, तिची स्थिती एवढी मजबूत होती की डाव सोडण्यावाचून मोनाकडे पर्यायच उरला नाही.