नामिबियाच्या खेळाडूचे मैदानावरच निधन
By Admin | Updated: November 22, 2015 04:07 IST2015-11-22T04:07:06+5:302015-11-22T04:07:06+5:30
नामिबियाचा यष्टिरक्षक फलंदाज रेमंड वॉन स्कूर याचे एका विभागीय वनडे चॅलेंज क्रिकेट स्पर्धेदरम्यान हृदयविकाराचा धक्क्याने शुक्रवारी रात्री निधन झाले. तो २५ वर्षांचा होता.

नामिबियाच्या खेळाडूचे मैदानावरच निधन
विंडहोक : नामिबियाचा यष्टिरक्षक फलंदाज रेमंड वॉन स्कूर याचे एका विभागीय वनडे चॅलेंज क्रिकेट स्पर्धेदरम्यान हृदयविकाराचा धक्क्याने शुक्रवारी रात्री निधन झाले. तो २५ वर्षांचा होता.
नामिबिया आणि फ्री स्टेट यांच्यादरम्यान पाच दिवसांआधी सीएसए प्रांतात ही स्पर्धा होती. यादरम्यान स्कूर १५ धावांवर खेळत होता; परंतु याचदरम्यान त्याला मैदानावरच अचानक हृदयविकाराचा अचानक झटका आला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दिवसापासून तो रुग्णालयातच होता आणि शुक्रवारी रात्री येथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
क्रिकेट नामिबियाचे अध्यक्ष रिचर्ड फ्रँकले यांनी वॉन स्कूर याला श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, ‘रेमंड नामिबिया क्रिकेट आणि राष्ट्रीय संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू होता. तो या खेळात आम्हाला पुढे घेऊन आला आहे; परंतु परमेश्वरास स्वर्गात त्याची आवश्यकता होती हे आम्ही स्वीकारले आहे. परमेश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.’
२00७ मध्ये १७ वर्षांचा असतानाच वॉन स्कूर याने राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते आणि फलंदाजी फळीतील तो महत्त्वाचा खेळाडू होता. याच आठवड्यात त्याने इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये कॅनडाविरुद्ध त्याच्या संघाला आठ गडी राखून विजय मिळवून दिला होता.
वॉन स्कूरने त्याच्या ९२ प्रथम श्रेणी सामन्यात २७.४0 च्या सरासरीने ४,३0३ धावा केल्या. त्यात पाच शतके आणि २0 अर्धशतकांचा समावेश आहे. २0१0 मध्ये बर्म्युडाविरुद्ध आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल शील्ड स्पर्धेत त्याची १५७ धावांची खेळी सर्वोत्तम आहे. याशिवाय त्याने सर्वच क्रिकेट स्वरूपात नामिबियासाठी २00 सामने खेळले असून, एकूण ८ हजार धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)
क्रिकेट साउथ आफ्रिकाने रेमंड वॉन स्कूरच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारुण लोर्गट म्हणाले की, इतक्या लहान वयात उदयोन्मुख खेळाडूचा मृत्यू होणे अतिशय क्लेशकारक आहे. त्याचा परिवार आणि मित्रांना झालेल्या दु:खात सीएसए सहभागी आहे.