T-20 मधलं पहिलं त्रिशतक भारतीयाच्या नावावर
By Admin | Updated: February 7, 2017 22:43 IST2017-02-07T22:35:37+5:302017-02-07T22:43:39+5:30
क्रिकेटच्या जगतात अनेकांच्या नावावर दररोज नवनवे रेकॉर्ड होतच असतात

T-20 मधलं पहिलं त्रिशतक भारतीयाच्या नावावर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - क्रिकेटच्या जगतात अनेकांच्या नावावर दररोज नवनवे रेकॉर्ड होतच असतात. मात्र दिल्लीच्या एका फलंदाजानं या सगळ्यांवर कडी करत क्रिकेटच्या विश्वात नवा इतिहास रचला आहे. मोहित अहलावत याने अवघ्या ७२ चेंडूंत त्रिशतकी खेळी करत क्रिकेटच्या मैदानात नवा विक्रम रचला आहे.
विशेष म्हणजे या सामन्यात मोहितने फलंदाजीचा शानदार नजराणा पेश करत 39 षटकार आणि 14 चौकार लगावले आहेत. या अलौकिक यशानंतर मोहित टी-20 क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 21 वर्षांच्या मोहित अहलावतनं हा चमत्कार करून दाखवला आहे. दिल्लीत मावी इलेव्हन आणि फ्रेंड्स इलेव्हन यांच्या दरम्यान टी-20चा हा सामना रंगला होता. मोहित मावी इलेव्हन या संघाकडून खेळत होता. मोहितनं शेवटच्या षटकात पाच चेंडूंवर लागोपाठ 5 षटकार मारले आहेत.
मोहितमुळे मावी इलेव्हनने 20 षटकांत 416 धावांची आघाडी उभी केली. क्रिकेटजगतात सर्वाधिक धावसंख्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावे आहेत. त्यानं आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 175 धावा काढल्या होत्या. मोहित दिल्लीच्या लाल बहादूर शास्त्री अकॅडमीतून शिक्षणाचे धडे गिरवतो आहे. याच अकॅडमीतून गौतम गंभीर आणि अमित मिश्रानं प्रशिक्षण घेऊन क्रिकेटमध्ये यश संपादन केलं आहे.