नाईक - शास्त्री वादाची चौकशी ‘कर्नल’ करणार
By Admin | Updated: October 31, 2015 10:55 IST2015-10-31T01:31:27+5:302015-10-31T10:55:38+5:30
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) उपाध्यक्ष आणि क्रिकेटविश्वात कर्नल नावाने ओळखले जाणारे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्याकडे वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर सुधीर नाईक

नाईक - शास्त्री वादाची चौकशी ‘कर्नल’ करणार
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) उपाध्यक्ष आणि क्रिकेटविश्वात कर्नल नावाने ओळखले जाणारे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्याकडे वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर सुधीर नाईक आणि भारतीय क्रिकेट संघाचे निर्देशक रवी शास्त्री यांच्यातील वादाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एमसीए प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
२५ डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत - दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यादरम्यान क्युरेटर सुधीर नाईक आणि भारतीय संघाचे निर्देशक रवी शास्त्री यांच्यात झालेल्या वादाने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले. यासंदर्भात नाईक यांनी शास्त्री यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती.
एमसीएचे अन्य उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी याबाबतीत सांगितले की, क्युरेटर नाईक यांनी त्या दिवशी झालेल्या वादाची पूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार एमसीए कार्यकारिणी समितीने याबाबतीत योग्य तो मार्ग काढण्याची जबाबदारी वेंगसरकर यांच्याकडे दिली आहे. तसेच वेंगसरकर हे या प्रकरणी दोन्ही बाजूने चर्चा करून ५ नोव्हेंबरला होणाऱ्या एमसीएच्या पुढील बैठकीत अहवाल देतील. त्यानंतरच या प्रकरणी पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.