नागपूरची खेळपट्टी ‘बोगस’ होती!
By Admin | Updated: December 2, 2015 04:09 IST2015-12-02T04:09:08+5:302015-12-02T04:09:08+5:30
भारत-द. आफ्रिका यांच्यात २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान विदर्भ क्रिकेट स्टेडियमच्या जामठा स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना खेळविण्यात आला. या सामन्यासाठी बनविण्यात आलेली

नागपूरची खेळपट्टी ‘बोगस’ होती!
दुबई : भारत-द. आफ्रिका यांच्यात २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान विदर्भ क्रिकेट स्टेडियमच्या जामठा स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना खेळविण्यात आला. या सामन्यासाठी बनविण्यात आलेली खेळपट्टी ‘बोगस’ असल्याची नोंद आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारा नियुक्त मॅच रेफ्री जेफ क्रो यांनी केली आहे.
क्रो यांनी आयसीसीला दिलेल्या अहवालात हा उल्लेख केला असल्याने यजमान विदर्भ क्रिकेट संघटना आणि बीसीसीआयला मान झुकविण्याची वेळ आली आहे. आयसीसीच्या पीच पाहणी समितीच्या प्रक्रियेअंतर्गत खेळपट्टीच्या स्वरूपाची समीक्षा करण्यात येणार आहे. प्रक्रियेतील नियम ३ नुसार क्रो यांनी आपला अहवाल आयसीसीला सोपविला. त्यात खेळपट्टीच्या स्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. हा अहवाल बीसीसीआयला देखील पाठविण्यात आला. त्यावर उत्तर सादर करण्यास १४ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
व्हीसीए स्टेडियम बीसीसीआय अध्यक्ष आणि आयसीसी चेअरमन शशांक मनोहर यांचे ‘होम ग्राऊंड’ आहे. या खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून चेंडू फिरायला लागला होता. तीन दिवसांत कसोटी सामना संपला. भारताने विजयासह कसोटी मालिका २-० ने जिंकली.
बीसीसीआयने उत्तर सादर केल्यानंतर आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापक ज्योफ एलर्डिस आणि आयसीसीचे मुख्य मॅच रेफ्री रंजन मदुगुले हे सर्व तथ्यांवर विचार करणार आहेत. त्यात सामन्याचे व्हिडिओ फुटेजदेखील पडताळण्यात येईल. त्यानंतरच व्हीसीएची खेळपट्टी बोगस होती अथवा नाही, यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. याशिवाय दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे.(वृत्तसंस्था)
व्हीसीएची खेळपट्टी : आयसीसीकडे तक्रार
अॅलर्डिस आणि मदुगुले हे स्वत:चा निर्णय देईस्तोवर कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. नागपूर कसोटीत भारताने २१५ आणि १७३ धावा केल्या, तर द. आफ्रिका संघ ७९ आणि १८५ धावांत बाद झाला होता.
या खेळपट्टीवर अनेक दिग्गजांनी सडकून टीका केली. त्यात आॅस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडेन, इंग्लंडचा मायकेल वॉन यांचा प्रामुख्याने समावेश होता. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि संचालक रवी शास्त्री यांनी मात्र भक्कम बचाव करीत खेळपट्टीत काहीही वाईट नव्हते, अशी प्रतिक्रिया दिली. शास्त्री यांनी तर याही पुढे जाऊन युक्तिवाद केला. ते म्हणाले,‘चेंडू पहिल्या दिवसापासून टर्न घेऊ नये, असा कुठला नियम सांगतो. चेंडू केवळ स्ंिवग आणि सीम करेल, असे नियमांत म्हटले आहे. द. आफ्रिका संघाने मात्र कुठलीही टीका केली नसून अधिकृत तक्रारदेखील नोंदविली नाही.