बेर्डिचकडून नदालचा धक्कादायक पराभव
By Admin | Updated: January 28, 2015 02:18 IST2015-01-28T02:18:08+5:302015-01-28T02:18:08+5:30
दुखापत आणि खराब फॉर्मशी झगडणारा स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याच्यावर आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झेक

बेर्डिचकडून नदालचा धक्कादायक पराभव
मेलबोर्न : दुखापत आणि खराब फॉर्मशी झगडणारा स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याच्यावर आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झेक प्रजासत्ताकाच्या टॉमस बेर्डिचकडून पराभवाची नामुष्की ओढावली़ ब्रिटनचा अँडी मरे, रशियाची मारिया शारापोव्हा यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला़
पुरुष गटातील एकेरीत सातवे मानांकनप्राप्त बेर्डिचने १४ वेळा ग्रँडस्लॅमविजेत्या आणि तृतीय मानांकनप्राप्त नदालवर २ तास आणि १३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-२, ६-०, ७-६ अशा फरकाने मात करताना थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला़ बेर्डिचला पुढच्या सामन्यात ब्रिटनच्या अँडी मरेशी झुंज द्यावी लागेल़ दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत २ तास आणि ५ मिनिटे चाललेल्या लढतीत मरे याने आॅस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय निक किर्गियोस याच्यावर ६-३, ७-६, ६-३ अशा सरळ सेटमध्ये सहज मात करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला़
महिला एकेरी गटात द्वितीय मानांकनप्राप्त रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हा हिने लौकिकाला साजेसा खेळ करताना ७८ मिनिटांत कॅनडाच्या इयुगेनी बुचार्ड हिचे आव्हान ६-३, ७-६, ६-३ अशा फरकाने मोडीत काढून उपांत्य फेरी गाठली़ मारियाला सेमीफानलमध्ये आपल्याच देशाच्या इकतेरिना मकारोव्हाचा सामना करावा लागणार आहे़ दहावे मानांकनप्राप्त मकारोव्हा हिने रुमानियाच्या तृतीय मानांकित सिमोना हालेपवर ६-४, ६-० असा शानदार विजय मिळवून आगेकूच केली़ स्पर्धेत सर्वांची नजर नदाल आणि बेर्डिच यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यावर होती़ अखेर नदालविरुद्ध १७ वेळा पराभवाचे तोंड पाहावे लागल्यानंतर बेर्डिचने पहिला विजय मिळविला़ बेर्डिच सलग दुसऱ्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे़