नदालच लाल बादशहा
By Admin | Updated: June 9, 2014 04:11 IST2014-06-09T04:11:39+5:302014-06-09T04:11:39+5:30
रोला गॅरोजची लाल माती आणि स्पेनचा तरणाबांड रांगडा गडी राफेल नदाल यांचे सख्य जगजाहीर आहे.

नदालच लाल बादशहा
पॅरीस : रोला गॅरोजची लाल माती आणि स्पेनचा तरणाबांड रांगडा गडी राफेल नदाल यांचे सख्य जगजाहीर आहे. अव्वल मानांकित राफेल नदालने रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव करीत फ्रेंच ओपनमध्ये विक्रमी नववे विजेतेपद पटकाविले आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. नदालने या लढतीत जोकोव्हिचचा ३-६, ७-५, ६-२, ६-४ ने पराभव करीत कारकीर्दीत १४ व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. फ्रेंच ओपनमध्ये सलग पाचवेळा विजेतेपदाचा मान मिळविणारा नदाल पहिला टेनिसपटू ठरला. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद पटकाविणाऱ्या खेळाडूंत नदाल पीट सॅम्प्रससह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. रॉजर फेडरर १७ विजेतेपदांसह अव्वल स्थानी आहे.
सातव्यांदा अंतिम फेरीत ‘आमने-सामने’ असलेल्या नदाल-जोकोव्हिच लढतीचा प्रारंभ तणावपूर्ण झाला. जोकोव्हिचने सुरुवातीला ५-३ अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर नदालने नवव्या गेममध्ये दोन गुण वसूल केले, पण जोकोव्हिचने फोरहँडचा जोरकस फटका लगावत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये नदालने चमकदार खेळ करीत ४-२ अशी आघाडी घेतली. नदालने सर्व्हिसमध्ये चूक केल्याचा लाभ घेत जोकोव्हिचने ४-४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर जोकोव्हिचने केलेल्या चुकीचा लाभ घेत नदालने दोन सेट पॉर्इंट वसूल केले. उष्णतेच्या त्रासामुळे जोकोव्हिचला तिसऱ्या सेटमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)
पाचव्या व सातव्या गेममध्ये जोकोव्हिचला ब्रेक पॉर्इंट मिळाले, पण नदालच्या बचावापुढे त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. नदालने फोरहँडवर गुण वसूल करीत तिसरा सेट जिंकला. चौथ्या सेटदरम्यान जोकोव्हिचला उष्णतेचा त्रास जाणवला. त्याने ओकारीही केली. सहाव्या गेममध्ये त्याला सर्व्हिस राखण्यात अपयश आल्यानंतर त्याची स्थिती आणखी बिघडली. त्यानंतर त्याने दुहेरी चूक केल्यामुळे नदालचा विजय निश्चित झाला. (वृत्तसंस्था)