नदाल, शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: January 26, 2015 02:57 IST2015-01-26T02:57:41+5:302015-01-26T02:57:41+5:30
दुखापतीतून सावरत जबरदस्त कमबॅक करणाऱ्या स्पेनच्या राफेल नदाल आणि महिला गटात दुसरी मानांकित रुसची मारिया शारापोव्हा

नदाल, शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत
मेलबर्न : दुखापतीतून सावरत जबरदस्त कमबॅक करणाऱ्या स्पेनच्या राफेल नदाल आणि महिला गटात दुसरी मानांकित रुसची मारिया शारापोव्हा यांनी आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. कारकिर्दीतील १५वे ग्रॅण्डस्लॅम पटकाविण्यासाठी उत्सुक असलेल्या नदालने दक्षिण आफ्रिकेच्या केवीन अँडरसनचा सरळ सेटमध्ये ७-५, ६-१, ६-४ असा पराभव केला, तर शारापोव्हाने चीनच्या पेंग शुआईचा ६-३, ६-० असा फडशा पाडला.
रोड लेवर एरेना येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात नदालने साडेसहा फूट उंच अॅँडरसनला दोन तासांंपूर्वीच पराभूत केले. नदालने ३३ विनर्स लगावले आणि ८९ गुणांची कमाई केली. नदालने सहापैकी चार ब्रेक पॉर्इंट कमावले, तर अँडरसनला सहापैकी एकातही ब्रेक पॉर्इंट मिळविता आला नाही. नदालला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सातव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डीचशी मुकाबला करावा लागेल. बर्डीचने आॅस्ट्रेलियाच्या टॉमिकचा ६-२, ७-६, ६-२ असा पराभव केला.
महिला एकेरीत किताबाची प्रबळ दावेदार शारापोव्हाने अवघ्या ७५ मिनिटांत शुआईचे आव्हान परतविले. शारापोव्हाने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा चिनी खेळाडूची सर्व्हिस ब्रेक केली. मात्र, सात गेमच्या मॅरेथॉन सामन्यात शुआईने संघर्ष करीत चार ब्रेक पॉर्इंट कमाविले. शारापोव्हाने एकूण २७ विनर्स लगावले. शारापोव्हाचा पुढचा मुकाबला कॅनडाच्या युजिनी बुकार्डशी होणार आहे. बुकार्डने रोमानियाच्या इरिना कॅमेलिया बेगूवर ६-१, ५-७, ६-२ असा विजय साजरा केला. याआधी झालेल्या लढतीत रुसच्या एकातेरिना माकारोवाने जर्मनीच्या ज्युलिआ ज्योर्जिसला ६-३, ६-२ असे पराभूत केले. पुढच्या फेरीत तिला रोमानियाच्या सिमोना हालेपशी मुकाबला करावा लागेल. हालेपने बेल्जियमच्या यानिना विकमेयरचा ६-४, ६-२ असा पराभव केला.