नदाल पराभूत, सेरेनाची आगेकूच
By Admin | Updated: September 6, 2015 00:09 IST2015-09-06T00:09:54+5:302015-09-06T00:09:54+5:30
स्पेनचा आठवा मानांकित आणि १४ वेळेचा ग्रॅण्डस्लॅम विजेता राफेल नदाल अमेरिकन ओपन टेनिसमध्ये गेल्या एका दशकात सर्वांत खराब कामगिरीसह शनिवारी स्पर्धेबाहेर पडला.

नदाल पराभूत, सेरेनाची आगेकूच
न्यूयॉर्क : स्पेनचा आठवा मानांकित आणि १४ वेळेचा ग्रॅण्डस्लॅम विजेता राफेल नदाल अमेरिकन ओपन टेनिसमध्ये गेल्या एका दशकात सर्वांत खराब कामगिरीसह शनिवारी स्पर्धेबाहेर पडला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली सेरेना विल्यम्स हिची मात्र विजयी घोडदौड सुरूच आहे.
स्पेनचा १८वा मानांकित फेलिसियानो लोपेझ याने दहावा मानांकित मिलोस राओनिक याचा ६-२, ७-६, ६-३ ने पराभव केला.
गत चॅम्पियन सेरेनाने चुकांपासून बोध घेऊन तणावपूर्ण लढतीत १०१व्या स्थानावरील आपलीच सहकारी बेथानी माटेक हिच्यावर ३-६, ७-५, ६-० असा विजय नोंदविला. त्याआधी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला नोवाक जोकोविच याने दहाव्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाकडे झेप घेऊन इटलीचा आंद्रियास सेप्पी याचा ६-३, ७-५, ७-६ असा पराभव केला. यंदा तिसऱ्या जेतेपदाकडे आगेकूच करणाऱ्या जोकोविचचा इटलीच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध हा सलग ३०वा आणि सेप्पीविरुद्ध सलग ११वा विजय होता. गतविजेता क्रोएशियाचा मारिन सिलीच हा पराभूत होताना बचावला. पाच सेटपर्यंत रंगलेल्या थरारात ५६व्या स्थानावर असलेला कझाकिस्तानचा मिखाईल कुकुशकीन याने मारिनला ६-७, ७-६, ६-३, ६-७, ६-१ असे झुंजवले. सेरेनाची मोठी बहीण व्हीनसने १२वी मानांकित स्वित्झर्लंडची बेलिंडा बेनसिचप हिला सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ असे नमविले. बेलिंडाने टोरोंटो येथे सेमी फायनलमध्ये सेरेनाला धूळ चारली होती; पण व्हीनसविरुद्ध चारपैकी एकही लढत तिला जिंकता आलेली नाही. पुरुष गटात फ्रान्सचा बेनोइट पेयरे याने स्पेनचा टावॅमी रॉब्रेडो याला ७-६, ६-१, ६-१ असा धक्का देऊन पहिल्यांदा चौथी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)
सेरेना विक्रमाच्या
उंबरठ्यावर...
‘सध्या सर्वच स्पर्धा जिंकणारी सेरेना १९८८मध्ये स्टेफी ग्राफनंतर कॅलेंडर स्लॅम पूर्ण करणारी पहिली खेळाडू बनण्याच्या स्थितीत आहे. त्यासाठी सेरेनाला आणखी ४ विजय नोंदवावे लागतील. पुढच्या फेरीत ती १९वी मानांकित अमेरिकेची मेडिसन कीज हिच्याविरुद्ध खेळेल. सेरेनाने जेतेपद पटकावल्यास हे तिचे २२वे एकेरी ग्रॅण्डस्लॅम असेल. शिवाय, सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यात ती स्टेफीशी बरोबरी साधेल. सर्वाधिक २४ एकेरी ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा सर्वकालीन विक्रम मार्गारेट कोर्ट हिच्या नावावर आहे.
पेस दुहेरीत, सानिया मिश्रमध्ये पराभूत
अमेरिकन ओपनमध्ये लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला. सानियाचा मिश्र दुहेरीत तर लिएंडरचा पुरूष दुहेरीत पराभव झाला.
सानिया आणि ब्रुनो सोरेस या गतविजेत्या जोडीला पहिल्या फेरीतच आंद्रिया हलावाकोवा आणि लकास कुबोट या चेक गणराज्याच्या जोडीने ३-६,३-६ ने पराभूत केले.
त्या आधी पुरूष दुहेरीत लिएंडर पेस आणि फर्नांडो वर्दास्को या जोडीला पुरूष दुहेरीत दुसऱ्या फेरीत स्टिव्ह जॉन्सन आणइ सॅम क्वॅरी या बिगर मानांकित अमेरिकन जोडीने ५-७, ६-४, ३-६ असे पराभूत केले.
महिला दुहेरीत सानिया आणि मार्टिना हिंगीसचा सामना स्वित्झरलंडची टिमिया बाकसिंसज्की व तैवानची चिया जुंग चुआगशी होणार आहे.
नदालने पहिले दोन सेट ३-६,
४-६ गुणांनी जिंकले; पण त्यानंतरही सामना गमावला. ३२वा मानांकित इटलीचा फॅबियो फॉगनिनी याने त्याला ६-४, ६-३, ६-४ अशी धूळ चारली. २००५मध्ये अमेरिकेचा जेम्स ब्लॅक याच्याकडून तिसऱ्या फेरीत पराभूत झालेला नदाल या स्पर्धेतून त्यानंतर कधीही लवकर बाहेर पडला नव्हता. नदालने पहिले दोन सेट जिंकल्यानंतर सर्व म्हणजे १५१ सामने जिंकले होते.