१०० मीटरमध्येही विक्रम नोंदविण्यास नचिकेत सज्ज
By Admin | Updated: May 30, 2014 00:20 IST2014-05-30T00:12:14+5:302014-05-30T00:20:04+5:30
नरेश हाळणोर / नाशिक : राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेच्या ५० मीटर बटरफ्लायमध्ये गेल्या पाच वर्षांपासूनचा अबाधित असलेला विक्रम नाशिकच्या नचिकेत बुझरुकने अवघ्या दोन सेकंदाने मोडीत काढत आपल्या नावे केला, तर उद्या होणार्या १०० मीटर बटरफ्लायमध्येही अशी नोंद करण्यासाठी तो सज्ज आहे.

१०० मीटरमध्येही विक्रम नोंदविण्यास नचिकेत सज्ज
नरेश हाळणोर / नाशिक : राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेच्या ५० मीटर बटरफ्लायमध्ये गेल्या पाच वर्षांपासूनचा अबाधित असलेला विक्रम नाशिकच्या नचिकेत बुझरुकने अवघ्या दोन सेकंदाने मोडीत काढत आपल्या नावे केला, तर उद्या होणार्या १०० मीटर बटरफ्लायमध्येही अशी नोंद करण्यासाठी तो सज्ज आहे.
नचिकेत बुझरुक. नाशिकच्या निवेकचा जलतरणपटू. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्याची पाण्याशी दोस्ती झाली आणि गेल्या दहा वर्षांत त्याने लहान गटापासून ते शालेय गटापर्यंतच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारत आत्तापर्यंत ३०० पेक्षाही अधिक पदके पटकावली आहेत.
नचिकेतने आजपासून नाशिकरोड येथे सुरू झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेच्या १४ वर्षांआतील ५० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये सुवर्णपदक तर पटकावलेच; पण गेल्या पाच वर्षांपासूनचा विक्रमही मोडीत काढला. त्याने आदित्य सांगवेकर याच्या नावे असलेला विक्रम अवघ्या २ सेकंदांनी आपल्या नावे केला. ५० मीटर बटरफ्लायमध्ये नचिकेतने ०.२७.८७ अशी सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवित आदित्यचा ०.२९.५१ सेकंदाचा विक्रम मोडला.
बटरफ्लाय आणि फ्री स्टाईलमध्ये पटाईत असलेला नचिकेत पुण्याचे विनय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो आहे. गेल्या दहा वर्षांत त्याने चार आंतरराष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेतून सहभागी होत १०० मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक पटकावले आहे, तर राष्ट्रीय-राज्यस्तरीय स्पर्धांतून आत्तापर्यंत ३०० पेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे.
विक्रमासाठीच उतरणार
उद्या (दि. ३०) होणार्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारातही विक्रमी वेळेची नोंद करण्याचा ध्यास उराशी बाळगला असून, त्यादृष्टीनेच प्रयत्न करणार आहे. यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. त्यामुळेच अशी कामगिरी नोंदविता आली.
- नचिकेत बुझरुक, जलतरणपटू