मरे, क्विटोव्हाची आगेकूच
By Admin | Updated: July 3, 2015 04:34 IST2015-07-03T04:34:36+5:302015-07-03T04:34:36+5:30
माजी चॅम्पियन अँडी मरे आणि महिला गटातील गतविजेती पेट्रा क्विटोव्हा यांनी आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवताना आज येथे सरळ सेट्समध्ये सहज विजय मिळवताना

मरे, क्विटोव्हाची आगेकूच
लंडन : माजी चॅम्पियन अँडी मरे आणि महिला गटातील गतविजेती पेट्रा क्विटोव्हा यांनी आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवताना आज येथे सरळ सेट्समध्ये सहज विजय मिळवताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली.
तृतीय मानांकित आणि २0१३ चा चॅम्पियन मरे याला तिसरी फेरी गाठण्यासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. त्याने नेदरलँडच्या रॉबिन हास याचा एक तास २७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-१, ६-१, ६-४ असा पराभव केला. या २८ वर्षीय खेळाडूने २५ विनर्स मारले.
विजयानंतर मरे म्हणाला, की मी सामन्यात खूप चांगली सुरुवात केली. माझी सुरुवात वेगवान होती, तर रॉबिन थोडा संथ खेळत होता. तथापि, नंतर त्याने चांगला खेळ केला. या ब्रिटिश खेळाडूला अंतिम १६ मध्ये स्थान पक्के करण्यासाठी इटलीच्या आंद्रियास सेपी अथवा क्रोएशियाच्या बोर्ना कोरिच याच्याविरुद्ध दोन हात करावे लागतील.
मरेबरोबरच ब्रिटनचा अन्य एक खेळाडू जेम्स वॉर्डनेदेखील तिसरी फेरी गाठली. त्याने झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लेला चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-२, ७-६, ३-६, ६-३ असे नमवले. २00२ नंतर दोन ब्रिटिश खेळाडू विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्याची ही पहिलीच घटना आहे. पुरुष गटात स्पेनच्या २0 व्या मानांकित रॉबर्टो बतिस्ता आणि आॅस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथ हेदेखील पुढील फेरी गाठण्यात यशस्वी ठरले.
महिला गटात विद्यमान चॅम्पियन क्विटोव्हानेदेखील ५७ मिनिटांत जपानच्या कुरुमी नारा हिचे आव्हान संपुष्टात आणले. झेक प्रजासत्ताकच्या या खेळाडूने द्वितीय मानांकित खेळाडूला ६-२, ६-0 असे सहज पराभूत केले.
जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू कारेलिन वोज्नियाकी हिने काही प्रतिकूल स्थितीचा सामना केल्यानंतर तिसरी फेरी गाठली. तिने झेक प्रजासत्ताकच्या जागतिक क्रमवारीतील ८३ वी मानांकित खेळाडू डेनिसा एलेरटोव्हाचा ६-१, ७-६ असा पराभव केला. डेन्मार्कची २४ वर्षीय खेळाडू आणि पाचव्या मानांकित वोज्नियाकीची पुढील लढत इटलीच्या ३१ व्या मानांकित कॅमिला जियोर्गीशी होईल. कॅमिलाने स्पेनच्या लारा अरुआबरेना हिचा ६-0, ७-६ असा पराभव केला. पोलंड येथील २0१२ ची उपविजेती अग्निस्ज्का रंदावास्का हिने अवघ्या ४८ मिनिटांत अलिजा टोमलजानोविच हिचे ६-0, ६-२ असे आव्हान मोडीत काढताना पुढील फेरी गाठली.
रशियाच्या आठव्या मानांकित एकटेरिना मकारोव्हाला मात्र पराभवाची चव चाखावी लागली. तिला स्लोव्हाकियाच्या मॅगडलेना रिबारिकोव्हा हिने ६-२, ७-५ असे सरळ सेटस्मध्ये पराभूत केले. (वृत्तसंस्था)
मकारोव्हाआधी तृतीय मानांकित सिमोना हालेप, सातवी मानांकित अॅना इव्हानोविच आणि नववी मानांकित कार्ला सुआरेज नवारो यांनादेखील दुसऱ्या फेरीच्या पुढे जाण्यात अपयश आले. फ्रान्सच्या २५ व्या मानांकित एलिज कार्नेटला आज दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.
जर्मनीची दहावी मानांकित एंजेलिक केरबर तिसऱ्या फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली. तिने रशियाच्या अनस्तेसिया पावलिचेनकोव्हाचे आव्हान ७-५, ६-२ असे मोडीत काढले.
जर्मनीच्या १८ व्या मानांकित आणि २0१३ ची उपविजेती सॅबाईन लिस्कीने अमेरिकेच्या क्रिस्टियाना मॅकहाले हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २-६, ७-५, ६-१ असा पराभव केला. आता तिची लढत १५ व्या मानांकित स्वीस खेळाडू टिमिया बाकसिन्स्कीशी होईल.