मुरली विजयकडे मोठी क्षमता : रामन
By Admin | Updated: November 11, 2015 23:15 IST2015-11-11T23:15:40+5:302015-11-11T23:15:40+5:30
टीम इंडियाचा कसोटी सलामीवीर म्हणून मुरली विजय उत्कृष्ट फलंदाज आहे. तो वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचा खेळ पाहून पुढे आला आहे

मुरली विजयकडे मोठी क्षमता : रामन
मुंबई : टीम इंडियाचा कसोटी सलामीवीर म्हणून मुरली विजय उत्कृष्ट फलंदाज आहे. तो वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचा खेळ पाहून पुढे आला आहे. मात्र, विजय या दोघांना ‘कॉपी’ न करता स्वत:चा खेळ खेळत असून, त्या दोन्ही सलामीवीरांसारखी मोठी खेळी खेळण्याची क्षमता राखून आहे, असे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तमिळनाडूचे प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन यांनी सांगितले.
तमिळनाडूकडून देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या विजयचा खेळ रामन पुरेपूर ओळखून आहेत. कसोटी पुनरागमनानंतर विजयकडे केवळ बदली फलंदाज म्हणून पाहिले जात होते. ज्या वेळी सेहवाग किंवा गंभीर जखमी असायचे तेव्हा विजयला टीम इंडियात स्थान मिळायचे. मात्र, आज चित्र बदलले असून तो भारताचा भरवशाचा सलामीवीर झाला आहे.
रामन यांनी विजयबाबत सांगितले, की आयपीएलमध्ये तो जबरदस्त यशस्वी ठरला आणि याचा त्याला खूप फायदा झाला. यामुळेच त्याला नवनवे प्रयोग आणि आपल्या खेळात बदल करण्याची संधी मिळाली. आक्रमक फलंदाजी करण्यातही आपण तरबेज असल्याचे त्याने सिद्ध केले. मात्र, यामुळेच मध्यंतरी त्याचा खेळ खालावला असल्याचेही रामन यांनी सांगितले. आक्रमकपणे खेळण्याच्या नादात त्याचा खेळ काहीसा मंदावला. त्याला संघाबाहेर बसावे लागले. मात्र, कालांतराने कसोटी क्रिकेट आपल्यासाठी योग्य असल्याची जाणीव त्याला झाली आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्याने आज आपली स्वत:ची जागा निर्माण केली आहे. कसोटी क्रिकेटद्वारे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी असल्याचे त्याला कळाले, असे रामन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)