मुंबईची विजयी ‘हॅट्ट्रिक’

By Admin | Updated: May 4, 2015 01:03 IST2015-05-04T01:03:08+5:302015-05-04T01:03:08+5:30

लैंडल सिमेन्सस (५६ चेंडूत ७१ धावा) आणि पार्थिव पटेल (३६ चेंडूत ५९ धावा) यांनी दिलेल्या आक्रमक १११ धावांच्या सलामीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर

Mumbai's winning hat-trick | मुंबईची विजयी ‘हॅट्ट्रिक’

मुंबईची विजयी ‘हॅट्ट्रिक’

मोहाली : लैंडल सिमेन्सस (५६ चेंडूत ७१ धावा) आणि पार्थिव पटेल (३६ चेंडूत ५९ धावा) यांनी दिलेल्या आक्रमक १११ धावांच्या सलामीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यजमान किंग्स इलेव्हन पंजाबला २३ धावांनी नमवले. यासह मुंबईने यंदाच्या आयपीएल सत्रात शानदार विजयी हॅट्ट्रीक नोंदवली. त्याचवेळी पंजाबला सलग चौथ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.
मोहाली येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सिमेन्स आणि पार्थिव या सलामीवीरांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना पंजाबची जबरदस्त धुलाई केली. या दोघांच्या आक्रमक शतकी सलामीच्या जोरावर मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांची सुरुवात अडखळती झाली. वीरेंद्र सेहवाग (२) आणि ग्लेन मॅक्सवेल (१२) हे दोन्ही धोकादायक फलंदाज लवकर परतल्याने मुंबईने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. यानंतर मुरली विजय (३९) आणि डेव्हीड मिल्लर (४३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करुन संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हरभजनने विजयला बाद केल्यानंतर मलिंगाने मिल्लरचा अडसर दूर करुन पंजाबचे मानसिक खच्चीकरण केले.
कर्णधार जॉर्ज बेलीने (२१) नंतर तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेऊन किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला फारसे काही करण्यात यश न आल्याने अखेर मुंबईने पंजाबला ७ बाद १४९ धावांवर रोखले. मलिंगा (२/३१), जगदीश सुचिथ (१/३३) आणि हरभजन (१/२७) यांनी नियंत्रित मारा केला. तत्पूर्वी लैंडल - पार्थिव यांच्या धडाक्यानंतर धावगतीला खीळ बसल्याने मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार रोहितने २६ धावा काढल्या. या विजयासह मुंबईचे ८ गुण झाले असून पंजाब संघ अजूनही ४ गुणांसह तळाला कायम आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Mumbai's winning hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.