मुंबईकरांची विजयी सलामी
By Admin | Updated: February 26, 2017 04:10 IST2017-02-26T04:10:12+5:302017-02-26T04:10:12+5:30
कर्णधार आदित्य तरे (८३) आणि सिद्धेश लाड (६४) यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने रणजीविजेत्या गुजरातला ९८ धावांनी

मुंबईकरांची विजयी सलामी
मुंबई : कर्णधार आदित्य तरे (८३) आणि सिद्धेश लाड (६४) यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने रणजीविजेत्या गुजरातला ९८ धावांनी लोळवून विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने ५० षटकांत ९ बाद २७३ धावांची मजल मारल्यानंतर गुजरातचा डाव १७५ धावांमध्ये गुंडाळून मुंबईकरांनी रणजी स्पर्धेतील वचपा काढला.
चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव एकवेळ ३ बाद ४६ असा घसरला होता. मात्र, तरे आणि लाड यांनी मोक्याच्या वेळी ११७ धावांची निर्णायक भागीदारी करून संघाला सावरले. तरेने ८१ चेंडंूत १३ चौकारांसह ८३ धावा काढल्या, तर लाडने ६० चेंडूंत २ चौकार व उत्तुंग ५ षटकार ठोकताना ६४ धावा काढल्या. गुजरातच्या चिराग परमारने ४२ धावांत ४ बळी घेऊन मुंबईकरांच्या फटकेबाजीला काही प्रमाणात लगाम घातला.
यानंतर धावांचा पाठलाग करताना गुजरातची फलंदाजी ढेपाळली. आक्रमक सुरुवात केल्यानंतर कर्णधार पार्थिव पटेल (१८), हेत पटेल (१), मनप्रीत जुनेजा (१०), प्रियांक पांचाळ (३२), रुजुल भट (११) व चिराग परमार (२) ठराविक अंतराने बाद झाल्याने गुजरातची २२व्या षटकात ६ बाद १०२, अशी अवस्था झाली.
रोहित दहियाने ५१ चेंडूंत
३१ धावा करून संघाकडून
अपयशी झुंज दिली. मात्र, त्याला पुरेशी साथ मिळाली नाही. शिवम् मल्होत्राने ३, तर शार्दूल ठाकूर, प्रवीण तांबे यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडले. (क्रीडा प्रतिनिधी)
संक्षिप्त धावफलक :
मुंबई : ५० षटकांत ९ बाद २७३ धावा (आदित्य तरे ८३, सिद्धेश लाड ६४; चिराग परमार ४/४२) वि.वि. गुजरात : ४१.४ षटकांत सर्व बाद १७५ धावा (प्रियांक पांचाळ ३२, रोहित दहिया ३१; शिवम् मल्होत्रा ३/४९)