मुंबईची पुन्हा खडतर परीक्षा!

By Admin | Updated: April 25, 2015 00:15 IST2015-04-25T00:15:57+5:302015-04-25T00:15:57+5:30

‘दुनिया हिला देंगे’ म्हणत आयपीएलसाठी रणशिंग फुंकलेल्या मुंबई इंडियन्सला प्रत्यक्ष मैदानात मात्र प्रतिस्पर्धी संघ एकामागून एक धक्के देत आहेत.

Mumbai's tough test again! | मुंबईची पुन्हा खडतर परीक्षा!

मुंबईची पुन्हा खडतर परीक्षा!

मुंबई : ‘दुनिया हिला देंगे’ म्हणत आयपीएलसाठी रणशिंग फुंकलेल्या मुंबई इंडियन्सला प्रत्यक्ष मैदानात मात्र प्रतिस्पर्धी संघ एकामागून एक धक्के देत आहेत. एकूणच यंदाच्या सत्रातील कामगिरी पाहता मुंबई इंडियन्सची ही टॅग लाइन नक्की कोणासाठी आहे, याचेच कोडे पडले आहे. त्यात आज मुंबईला घरच्या मैदानावर आव्हान असेल ते बेधडकपणे खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचे.
सहा सामन्यांतून केवळ एकच विजय मिळवता आल्याने साहजिकच या सामन्यात मुंबई प्रचंड दडपणाखाली असेल. दिल्लीकरांनी गत सामन्यात जबरदस्त चोप देताना मुंबईकर गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. एकटा लसिथ मलिंगा प्रतिस्पर्धी संघाला जखडवून ठेवत आहे. तरी बळी घेण्यात त्याला अपयश येत आहे. कर्णधार रोहित शर्माने संघात अनेक बदल केले; मात्र त्यात यश मिळाले नाही. बंगळुरूविरुद्धच्या विजयाने संघ कायम राहील अशी आशा होती. परंतु दिल्लीविरुध्द पराभव झाल्याने आता संघात काय बदल होणार याबाबत उत्सुकता आहे. त्यातच कोरी अँडरसन दुखापतीमुळे आयपीएल बाहेर गेल्याने फिंचनंतर दुसऱ्या आक्रमक फलंदाजाला मुंबई मुकणार. त्याच वेळी ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखला जाणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू कॉलीन मुन्रो याची जोश हेजलवूडच्या जागी निवड झाल्याने मुंबईला चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
फलंदाजीमध्ये मुंबईची मदार नेहमीप्रमाणे लेंडल सिमन्स, रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड, उन्मुक्त चंद आणि अंबाती रायडू यांच्यावर असेल. तर गोलंदाजीत मलिंगा आणि हरभजनसिंग व्यतिरिक्त इतरांना आपली छाप पाडण्यात अपयश आले आहे.
दुसऱ्या बाजूला मुंबईच्या तुलनेत हैदराबाद चांगल्या लयीत आहेत. गत सामन्यात डेव्हीड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी केकेआरची धुलाई केली असल्याने मुंबईला या जोडीकडून धोका आहे. शिवाय गोलंदाजीमध्ये हैदराबादकडे डेल स्टेन, भुवनेश्वर कुमारसह मजबूत ताफा असल्याने मुंबईला विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागेल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Mumbai's tough test again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.