मुंबईने दिली पुण्याला ‘टपली’
By Admin | Updated: July 21, 2015 23:47 IST2015-07-21T23:47:33+5:302015-07-21T23:47:33+5:30
बलाढ्य यू मुंबा संघाने अपेक्षेप्रमाणे दबदबा राखताना पुणेरी पलटणचा २८-२१ असा सहज पराभव करून घरच्या मैदानावर सलग चौथा

मुंबईने दिली पुण्याला ‘टपली’
रोहित नाईक, मुंबई
बलाढ्य यू मुंबा संघाने अपेक्षेप्रमाणे दबदबा राखताना पुणेरी पलटणचा २८-२१ असा सहज पराभव करून घरच्या मैदानावर सलग चौथा विजय मिळवला. या वेळी रिशांक देवाडिगाने संपूर्ण सामन्यात अष्टपैलू खेळ केला, तर हुकमी शब्बीर बापूनेदेखील दमदार आक्रमण करून यू मुंबाची विजयी घोडदौड कायम राखली. विशेष म्हणजे गतस्पर्धेतील अंतिम सामना सोडल्यास यू मुंबाची घरच्या मैदानावर आतापर्यंत विजयी कामगिरी राहिली आहे. या विजयासह यू मुंबाने २० गुणांसह अग्रस्थान आणखी मजबूत केले.
वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा यू मुंबाला मिळाला. रिशांक, शब्बीर आणि कर्णधार अनुप कुमारच्या प्रत्येक चढाईवर प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला. सुरुवातीला दोन्ही संघांकडून चुरशीचा खेळ झाला.
पुणे संघ पुन्हा एकदा कर्णधार वझीर सिंगवर अवलंबून असल्याचे दिसले. वझीरने १५ पैकी ४ यशस्वी चढाया केली. एका बोनस
गुणासह त्याने पुण्याकडून सर्वाधिक
७ गुण कमावले. याव्यतिरीक्त महिपाल नरवालने आक्रमणात ४ तर तर विजेंदर सिंगने भक्कम बचावामध्ये २ गुण घेऊन चमक दाखवली.दुसऱ्या बाजूला यू मुंबाच्या खेळाडूंनी आपला हिसका दाखवताना मध्यंतरानंतर पुण्याला लोळवले. पहिल्या सत्रात पुणेरी पलटणने
झुंजार खेळ केल्याने मुंबाला मध्यंतराला १०-९ अशा एका गुणाच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. यानंतर मात्र मुंबईकरांनी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, पुणे संघाला मुंबईकरांवर लोण चढवण्याची नामी संधी होती. मात्र, आक्रमणात आत्मविश्वास दिसून येत नसल्याने वारंवार ही संधी हुकत होती. अखेर ३०व्या मिनिटाला प्रवीण निवालेले एकाच चढाईमध्ये शब्बीर व भूपेंदर सिंगला बाद करून पुण्याची पिछाडी १७-१८ अशी कमी केली.
यानंतर, वेळेची कमतरता पाहून मुंबईकरांनी ‘टाईमपास’ टाळला आणि सलग गुणांचा धडाका लावत पुण्यावर जबरदस्त दबाव टाकला. शेवटच्या काही मिनिटांत आघाडीवर असताना मुंबईने ३९व्या मिनिटाला लोण चढवून पुणेरी पलटणची हवा काढली. अखेरच्या मिनिटाला अनुपने आरामात चढाई करून वेळ घालवला आणि मुंबईने २८-२१ अशी सहज बाजी मारली.