मुंबईची चौथ्या स्थानी झेप

By Admin | Updated: May 6, 2015 03:08 IST2015-05-06T03:08:49+5:302015-05-06T03:08:49+5:30

मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील सलग चौथा विजय मिळवताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कडवे आव्हान ५ विकेटनी सहजरीत्या परतवले.

Mumbai's fourth position jump | मुंबईची चौथ्या स्थानी झेप

मुंबईची चौथ्या स्थानी झेप

दिल्ली डेअरडेव्हिल्स पराभूत : कर्णधार रोहित शर्मा, अंबाती रायडू, केरॉन पोलार्डची दमदार फलंदाजी

रोहित नाईक, मुंबई
पावसाच्या व्यत्ययानंतर कर्णधार रोहित शर्मा (४६), अंबाती रायडू (नाबाद ४८) आणि केरॉन पोलार्ड (नाबाद १९) यांच्या दणक्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील सलग चौथा विजय मिळवताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कडवे आव्हान ५ विकेटनी सहजरीत्या परतवले. संपूर्ण स्पर्धेत फारशी चमक न दाखविलेल्या युवराजसिंगच्या झुंजार अर्धशतकानंतरही दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानी मोठी झेप घेतली आहे.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला ६ बाद १५३ धावसंख्येवर रोखून अर्धी लढाई जिंकलेल्या मुंबई इंडियन्सच्या मार्गात पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेला विजय हुकणार का, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मुंबईच्या भरवशाच्या त्रयीने सामना पूर्णपणे पालटला.
झहीर खानने पहिल्याच चेंडूवर मुंबईचा हुकमी फलंदाज लेंडल सिमेन्सला बाद करून धोक्याचा इशारा दिला. यानंतर लगेच हार्दिक पंड्या (५)देखील कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर परतल्याने मुंबईची दुसऱ्याच षटकात २ बाद ८ धावा, अशी दयनीय अवस्था झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि पार्थिव पटेल यांनी थोडाफार प्रतिकार केला. दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट झाल्याने काही वेळ सामना थांबविण्यात आला.
या वेळी ४ षटकांत मुंबईने २ बाद २५ अशी मजल मारली होती. खेळ सुरू झाल्यानंतर लगेच पार्थिव बाद झाल्याने मुंबईची ३ बाद २९ अशी घसरगुंडी उडाली. लगेच भज्जीच्या रूपाने मुंबईला आणखी एक धक्का बसला आणि त्याच वेळी पावसाने दमदार हजेरी लावली. या वेळी सामना होणार की नाही, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सुमारे २० मिनिटांच्या व्यत्ययानंतर सामना सुरू झाल्यावर रोहित, रायडू व पोलार्ड यांनी दमदार फटकेबाजी करून मुंबईला ५ बाद १५३ अशी विजयी मजल मारून दिली.
रोहितने ३७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार खेचले, तर रायडूने ४० चेंडूंत ४ चौकार व एक षटकार खेचताना महत्त्वपूर्ण ४९ धावा फटकावल्या. पोलार्डनेदेखील निर्णायक २६ धावा काढताना १४ चेंडूंत ३ षटकरांचा तडाखा दिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना युवराजच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर ६ बाद १५२ धावा उभारल्या. याव्यतिरीक्त कर्णधार जेपी ड्युमिनीने २६ धावांची आक्रमक खेळी साकारली. मुंबईकडून हरभजन (२/११) आणि मलिंगा (२/३३) यांनी टिच्चून मारा केला.


धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : मयंक अगरवाल झे. पटेल गो. मलिंगा ०; श्रेयस अय्यर झे. विनयकुमार गो. हरभजनसिंग १९; जेपी ड्युमिनी झे. व गो. सुचित २८; केदार जाधव यष्टीचीत पटेल गो. हरभजन १६; युवराजसिंग झे. सिमेन्स गो. मलिंगा ५७; अँजेलो मॅथ्यूज झे. सुचिथ गो. पंड्या १२; सौरभ तिवारी नाबाद १३; एनएम कोल्टर नाईल ३; अवांतर : ४, एकूण : २० षटकांत ६ बाद १५२ धावा; गोलंदाजी : लसिथ मलिंगा ४-०-३३-२; मिचेल मॅक्लेनघन ४-०-३७-०; आर. विनयकुमार ३-०-३१-०; हरभजनसिंग ४-१-११-२; जगदीश सुचित ३-०-२४-१; हार्दिक पंड्या २-०-१३-१.
मुबंई इंडियन्स : लेंडल सिमन्स पायचित गो. खान ०, पार्थिव पटेल झे. मिश्रा गो. मॅथ्यूज १३, हार्दिक पंड्या झे. इम्रान ताहीर गो. कोल्टर नाईल ५, राहित शर्मा त्रि. गो. मिश्रा ४६, हरभजनसिंग त्रि. गो. कोल्टर नाईल ५, अंबाती रायडू नाबाद ४९, केरॉन पोलार्ड नाबाद २६ अवांतर :०९; एकूण : १९.३ षटकांत ५ बाद १५३; गोलंदाजी : झहीर खान ४-०-३२-१, नाथन कोल्टर नाईल ४-१-३०-२ , अँजेलो मॅथ्यूज ४-०-३३-१, युवराजसिंग १-०-५-०, अमित मिश्रा ४-०-२५-१, इम्रान ताहीर २.३-०-२७-०.

Web Title: Mumbai's fourth position jump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.