मुंबईचा रोमांचक विजय
By Admin | Updated: November 26, 2015 02:29 IST2015-11-26T02:29:09+5:302015-11-26T02:29:09+5:30
गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात बलाढ्य मुंबईने पुन्हा एकदा आपल्या ‘खडूस’ खेळीचे प्रदर्शन करताना मध्य प्रदेशविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.

मुंबईचा रोमांचक विजय
इंदौर : गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात बलाढ्य मुंबईने पुन्हा एकदा आपल्या ‘खडूस’ खेळीचे प्रदर्शन करताना मध्य प्रदेशविरुद्ध रोमांचक विजय मिळवला. यासह मुंबईने रणजी स्पर्धेच्या ‘ब’ गटात ३२ गुणांसह अग्रस्थान आणखी मजबूत केले असून स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करणारा पहिल्या संघाचा मानही मिळवला.
फिरकीपटूंचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात यजमान मध्य प्रदेशने मुंबईसमोर २८० धावांचे कठीण आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान यशस्वीपणे पेलताना ७ फलंदाजांच्या मोबदल्यात तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला. तिसऱ्या दिवशी फलंदाजीला सुरुवात करताना मुंबईचा डाव ७ बाद २१५ असा घसरल्यानंतर इक्बाल अब्दुल्ला आणि शार्दुल ठाकूर यांनी निर्णायक ६८ धावांची नाबाद भागीदारी करून मुंबईला विजयी केले.
गेल्या काही सामन्यांपासून फ्लॉप ठरलेल्या जय बिस्तने या वेळी जबरदस्त खेळ करताना शानदार ७४ धावांची खेळी करून मुंबईच्या विजयाचा पाया रचला. अखिल हेरवाडकर अवघी एक धाव करून परतल्यानंतर बिस्त आणि श्रेयश अय्यर यांनी ९९ धावांची भागीदारी करून मुंबईला सावरले. सामन्यात मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरलेल्या जलज सक्सेनाने अय्यरला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर आलेला सूर्यकुमारही फारशी चमक न दाखवता परतला आणि काही वेळानेच एका बाजूने खंबीरपणे खेळत असलेला बिस्तही बाद झाला. बिस्तने
१०५ चेंडूंत ७ चौकार व २
षटकारांसह ७४ धावांची संयमी खेळी केली.
यानंतर ठरावीक अंतराने फलंदाज बाद झाल्याने मुंबईचा डाव ७ बाद २१५ असा घसरला. या वेळी मुंबईवर पराभवाचे संकट होते. मात्र इक्बाल आणि शार्दुल यांनी आठव्या विकेटसाठी निर्णायक नाबाद अर्धशतकी भागीदारी करून मध्य प्रदेशच्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. मध्य प्रदेशच्या जलजने दुसऱ्या डावातही चांगला मारा करताना ८९ धावांत ४ बळी घेतले, तर अंकित शर्मा व मिहिर हिरवानी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
या विजयासह मुंबईने बाहेरच्या मैदानावर खेळताना सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला. यासह मुंबईने यंदाच्या रणजी स्पर्धेत बाद फेरी गाठली आहे. ‘ब’ गटात मुंबईने ७ सामन्यांतून सर्वाधिक ३२ गुणांची कमाई करताना आपले अग्रस्थान आणखी मजबूत केले आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशचे ७ सामन्यांनंतर १७ गुण असून बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत.
मध्य प्रदेश (पहिला डाव) : सर्व बाद २४० धावा.
मुंबई (पहिला डाव) : सर्व बाद १६२ धावा.
मध्य प्रदेश (दुसरा डाव) : सर्व बाद २०१ धावा.
मुंबई (दुसरा डाव) : अखिल हेरवाडकर झे. जैन गो. सक्सेना १, जय बिस्त त्रि. गो. सक्सेना ७४, श्रेयश अय्यर झे. व गो. हिरवानी ३६, सूर्यकुमार यादव झे. व गो. सक्सेना १८, आदित्य तरे त्रि. गो. सक्सेना ४५, सिद्धेश लाड झे. हरप्रीत सिंग गो. अंकित शर्मा १८, इक्बाल अब्दुल्ला नाबाद ३९, निखिल पाटील धावबाद (पाटीदार) ३, शार्दुल ठाकूर नाबाद ३८. अवांतर - ११. एकूण : ७३.३ षटकांत ७ बाद २८३ धावा.
गोलंदाजी : ईश्वर पांड्ये ३-०-२०-०; जलज सक्सेना २७-४-८९-४; अंकित शर्मा २६.३-१-८३-१; मिहिर हिरवानी १०-०-६२-१; एस. जैन ६-१-१४-१; रमीझ खान १-०-४-०.