मुंबईचा ‘डबल धमाका’ टीम इंडियासाठी सज्ज
By Admin | Updated: December 29, 2015 01:17 IST2015-12-29T01:17:47+5:302015-12-29T01:17:47+5:30
मुंबई शालेय क्रिकेटमध्ये सध्या रिझवी स्प्रिंगफिंगल्ड संघाचे एकहाती वर्चस्व आहे. स्पर्धा कोणतीही असो, अंतिम सामन्यात रिझवीचा संघ असणारच हे निश्चित असते. याच संघातील

मुंबईचा ‘डबल धमाका’ टीम इंडियासाठी सज्ज
मुंबई : मुंबई शालेय क्रिकेटमध्ये सध्या रिझवी स्प्रिंगफिंगल्ड संघाचे एकहाती वर्चस्व आहे. स्पर्धा कोणतीही असो, अंतिम सामन्यात रिझवीचा संघ असणारच हे निश्चित असते. याच संघातील दोन फलंदाजांनी मुंबई क्रिकेटवर अक्षरश: दबदबा राखला आणि आज हेच दोन फलंदाज १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यास सज्ज झाले आहेत. हे दोन फलंदाज आहेत, सर्फराज खान आणि अरमान जाफर.
यंदा झालेल्या आयपीएलच्या आठव्या पर्वात रॉयल चँलेंजर्स बंगळुरु कडून खेळताना युवा सर्फराजने साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले, तर देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज वासिम जाफर याचा पुतण्या अरमान जाफरने आपल्या तंत्रशुध्द फलंदाजीने स्वत:ची ‘रनमशीन’ म्हणून ओळख निर्माण केली. सोमवारी वांद्रेच्या रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेने आपल्या या दोन्ही शिष्यांचा सत्कार करून, त्यांना आगामी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचे मार्गदर्शन मिळत असलेला सर्फराज म्हणाला की, ‘राहुलसरांकडून खूप शिकलो. ते संयमी खेळीसाठी ओळखले जातात, तर मी आक्रमक खेळीला प्राधन्य देतो, परंतु त्यांनी मला कधीही रोखले नाही. आक्रमणापासून थांबू नको, पण ५० षटके टिकल्यास विजय निश्चित आपला आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली.’ दुसरीकडे अरमान पहिल्यांदाच ब्ल्यू जर्सी परिधान करण्यास सज्ज आहे. मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सर्फराझसह एकाच संघातून खेळण्याची संधी मिळणार असल्याबद्दल तो म्हणाला, ‘आमच्यातील ताळमेळ खूप उत्तम असून, शालेय क्रिकेटमधील अनुभवाचा आम्हाला फायदा होईल.’
गेलने दिला विश्वास...
आयपीएलमध्ये आरसीबी संघातून खेळताना धडाकेबाज ख्रिस गेलकडून महत्त्वाचा संदेश मिळाल्याचे सर्फराज म्हणतो. गेलचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. कधीही अपयशी झाल्यास नाराज न होता, पुन्हा एकदा त्याहून चांगली कामगिरी करण्यास सज्ज व्हावे, असा संदेश गेलने दिला असल्याचे सर्फराजने सांगितले.
सर्फराज खूप आक्रमक फलंदाज आहे. तो स्वीपचा फटका मारण्यात तरबेज आहे. कोणत्याही गोलंदाजाला स्वीप मारून त्याची लय बिघवडण्यात सर्फराज तरबेज आहे. ज्यावेळी तो पूर्ण जोशमध्ये असतो, तेव्हा नॉन स्ट्राइकला उभे राहून त्याची फलंदाजी बघण्यासारखी असते.
- अरमान जाफर
अरमानच्या फलंदाजीतील संयम आवडतो. तो खेळपट्टीवर टिकून राहतो. त्याच्यातील थोडासा संयम जरी माझ्याकडे आला, तर माझी फलंदाजी आणखी बहरू शकते. त्याला टीम इंडियात पाहणे खूप आनंददायक आहे. आमच्यातील ताळमेळ उत्तम असल्याने प्रतिकूल परिस्थितीत तो माझ्यासह फलंदाजीला असल्यास दडपण नसेल.
- सर्फराज खान