मुंबईचा अभिमन्यू गांधी चॅम्पियन
By Admin | Updated: August 2, 2016 04:22 IST2016-08-02T04:22:55+5:302016-08-02T04:22:55+5:30
खुल्या स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अभिमन्यू गांधीने मुंबईच्याच प्रियांक जयस्वालचा ४-२ अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले

मुंबईचा अभिमन्यू गांधी चॅम्पियन
मुंबई : पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आयोजित राज्यस्तरीय खुल्या स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अभिमन्यू गांधीने मुंबईच्याच प्रियांक जयस्वालचा ४-२ अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले. अंतिम फेरी मुंबईकरांमध्येच झाल्याने स्पर्धेवर मुंबईचे एकाहाती वर्चस्व राहिले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेत दोन्ही मुंबईकरांमधील अंतिम लढतीत चांगलीच रंगली. अडीच तास चाललेली ही निर्णायक लढत २८ वर्षीय अभिमन्यूने ४८-५६, ५०-११, २६-६९, ७५-२५, ६१-२७, ६३-५६ अशी जिंकली.
४ फ्रेमनंतर सामना २-२ असा बरोबरीत होता. पाचव्या फ्रेममध्ये अभिमन्यूने झुंजार खेळ करताना ६१-२७ अशी आघाडी घेतली. सहाव्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करीत रंगत वाढवली. एकवेळ दोघांचेही गुण समान होते. या निर्णायक क्षणी प्रियांक दबावाखाली आल्याने त्याचे गुण हुकले. याचा पूरेपूर फायदा उचलत अभिमन्यूने अचूक स्ट्रोकचा धडाका लावताना दिमाखात विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच, सर्वाधिक गुणांच्या ब्रेकचे पारितोषिक आनंद रघुवंशीने पटकावले. (क्रीडा प्रतिनिधी)
>निकाल : अंतिम फेरी : अभिमन्यू गांधी (मुंबई) विवि प्रियांक जयस्वाल (मुंबई) ४८-५६, ५०-११, २६-६९, ७५-२५, ६१-२७, ६३-५६.