मुंबईकर रायनचे शानदार विजेतेपद

By Admin | Updated: September 7, 2015 00:26 IST2015-09-07T00:26:35+5:302015-09-07T00:26:35+5:30

मुंबईकर रायन पंडोळे याने हैदराबाद येथे झालेल्या १८ वर्षांखालील आयटीएफ ज्युनियर (ग्रेड ४) स्पर्धेत शानदार विजेतेपद पटकावताना बिगरमानांकित सनील जगतीयानीचा २-० असा फडशा पाडला

Mumbaikar Ryan's magnificent title | मुंबईकर रायनचे शानदार विजेतेपद

मुंबईकर रायनचे शानदार विजेतेपद

मुंबई : मुंबईकर रायन पंडोळे याने हैदराबाद येथे झालेल्या १८ वर्षांखालील आयटीएफ ज्युनियर (ग्रेड ४) स्पर्धेत शानदार विजेतेपद पटकावताना बिगरमानांकित सनील जगतीयानीचा २-० असा फडशा पाडला. सलामीच्या सामन्यात बाय मिळाल्यानंतर रायनने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक खेळाचा धडाका करताना विजेतेपदाला गवसणी घातली.
तेलंगणा राज्य टेनिस संघटनेच्या वतीने हैदराबाद येथील एसएटीएस टेनिस कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रायनने एकहाती वर्चस्व राखले. ताकदवर सर्व्हिस, वेगवान खेळ या जोरावर वर्चस्व राखलेल्या रायनने ६-१, ६-२ असा सहज विजय मिळवताना संपूर्ण सामन्यात सनीलला फारशी संधीच दिली नाही.
पहिल्याच सामन्यात पुढील फेरीसाठी चाल मिळाल्यानंतर रायनने यानंतर अनुक्रमे अंशुमन गुलीया आणि आदिल कल्याणपूरकर यांना सरळ दोन सेटमध्ये नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यावेळी त्याने स्पर्धेतील पहिला अनपेक्षित निकाल नोंदवताना तृतीय मानांकित कसलेल्या ध्रुव सुनीशचा ६-७(२), ६-४, ६-० असा पराभव केला. हा विजय केवळ फ्ल्यूक नसल्याचे सिद्ध करताना त्याने उपांत्य फेरीत खळबळजनक निकाल नोंदवत थेट अव्वल मानांकित व संभाव्य विजेत्या वशिष्ठ चेरुकू याचे तगडे आव्हान ३-६, ७-६(३), ६-२ असे परतावले. पहिला सेट गमावल्यानंतरही रायनने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना शानदार बाजी मारली.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सनीलने द्वितीय मानांकित अ‍ॅलेक्स सोलंकीला ७-६(२), ६-७(३), ६-१ असे नमवून अंतिम फेरी गाठली असल्याने रायन समोर विजेतेपदासाठी कडवे आव्हान होते. मात्र फुल फॉर्ममध्ये असलेल्या रायनने या निर्णायक सामन्यात आपला हिसका दाखवताना सनीलचा सहज धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Mumbaikar Ryan's magnificent title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.