मुंबई विजयी ‘हॅट्ट्रिक’च्या प्रयत्नात
By Admin | Updated: May 2, 2015 23:58 IST2015-05-02T23:58:52+5:302015-05-02T23:58:52+5:30
सलग दोन विजय मिळवून विजयी मार्गावर आलेले मुंबई इंडियन्स आज मोहाली येथे किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध भिडेल.

मुंबई विजयी ‘हॅट्ट्रिक’च्या प्रयत्नात
मोहाली : सलग दोन विजय मिळवून विजयी मार्गावर आलेले मुंबई इंडियन्स आज मोहाली येथे किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध भिडेल. एका बाजूला मुंबईने हैदराबाद व राजस्थानला सलग सामन्यात नमवले. दुसऱ्या बाजूला चांगल्या सुरुवातीनंतर एकामागून एक पराभवाचे धक्के खाणाऱ्या पंजाब समोर आव्हान कायम राखण्याचे कठीण आव्हान आहे. एकूणच, दोन्ही संघांची कामगिरी पाहता मुंबईचे पारडे या सामन्यात वरचढ असेल. त्यातच याआधी या दोघांतच झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईला नमवले असल्याने, या पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी मुंबई त्वेषाने खेळतील.
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या बलाढ्य राजस्थान रॉयल्सला ८ धावांनी मात देत इतर संघांना आपली दखल घेण्यास भाग पाडली. घरच्या मैदानावर सकारात्मकरीत्या खेळणारे मुंबईकर आज पंजाबला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याच्या उद्देशाने खेळतील. सुरुवातीच्या काही सामन्यात आघाडीचे फलंदाज फॉर्ममध्ये न आल्याची समस्या मुंबई समोर होती. मात्र, गतसामन्यात अंबाती रायडूने दमदार अर्धशतकी खेळी करून राजस्थान विरुद्धच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळे आता मुंबईकडे लैडल सिमेन्स, कर्णधार रोहित शर्मा, रायडू आणि किएरॉन पोलार्ड अशी मजबूत फलंदाजी आहे. तरी पार्थिव पटेल व उन्मुक्त चंद यांना एखाद दुसरा सामन्याचा अपवाद सोडता आपली छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये मात्र मुंबईने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. लसिथ मलिंगा व हरभजन सिंग यांनी प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणले खरे, मात्र इतर गोलंदाजांकडून योग्य साथ न लाभल्याने त्यांच्या कामगिरीचा फायदा मुंबईला घेता येत नव्हता.
मात्र, मागील दोन सामन्यांत मुंबईच्या विजयात गोलंदाजांची कामगिरी निर्णायक राहिली. मिचेल मॅकल्लेनघन, जगदीश सुचिथ आणि विनयकुमार यांनीदेखील नियंत्रित मारा करून मुंबईच्या गोलंदाजीला बळकटी आणली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा संघ समतोल बनला असून, सध्या तरी संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
दुसऱ्या बाजूला ४ गुणांसह गुणतालिकेत तळाला असलेल्या पंजाबची अवस्था केविलवाणी आहे. त्यांना एकामागून एक पराभव पत्करावा लागत असल्याने संघात आत्मविश्वासाचा अभाव आहे. तसेच, पंजाबने अनेकदा संघबदलाचे प्रयोग केले; परंतु त्यात फारसे यश मिळत नसल्याने पंजाबसमोर सारेच काही कठीण आहे. गत सामन्यात दिल्लीसमोर उडालेली दैना पाहता पंजाबच्या फलंदाजांना मोठे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)