पुणेविरुद्ध मुंबई लढत रंगणार
By Admin | Updated: October 4, 2015 23:48 IST2015-10-04T23:48:37+5:302015-10-04T23:48:37+5:30
सर्वांत महाग खेळाडू ह्युगेन्सन लिंगडोह आणि भारताचा विक्रमी स्ट्रायकर सुनील छेत्री यांच्या खेळाचा थरार महाराष्ट्र डर्बी म्हणून इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) परिचित असलेल्या

पुणेविरुद्ध मुंबई लढत रंगणार
पुणे : सर्वांत महाग खेळाडू ह्युगेन्सन लिंगडोह आणि भारताचा विक्रमी स्ट्रायकर सुनील छेत्री यांच्या खेळाचा थरार महाराष्ट्र डर्बी म्हणून इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) परिचित असलेल्या पुणे-मुंबई यांच्यात सोमवारी होणाऱ्या लढतीदरम्यान फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही लढत रंगणार आहे. पुण्याकडून खेळणारा रोमानियाचा आद्रियान मुटू आणि मुंबईचा फ्रेंच फायरमॅन निकोलस अनेल्का यांच्यात कोण गोल नोंदविण्याची सरशी साधतो, हे या सामन्यात दिसेल. विजयी प्रारंभ करण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
यंदाच्या हंगामासाठी पुण्याच्या संघाची जबाबदारी वर्ल्डकप आणि इंग्लिश लीग गाजविलेले इंग्लिश स्टार खेळाडू डेव्हिड प्लॅट यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कर्णधार डीडीएर झोकोरा, आघाडीचा स्ट्रायकर मुटू, त्याच्या जोडीला टुनके सॅन्ली, येड्रिक रुईज असे धडाकेबाज कॉम्बिनेशन जमविण्यात आले. त्याच्याच जोडीला गेल्या वर्षीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आलेला लिंगडोह हा मध्यफळी भक्कम बनवेल.
मुबंई संघाकडून अनेल्का याच्या जोडीला भारताचा विक्रमी स्ट्रायकर छेत्री असल्याने मुंबईच्या आक्रमणाला धार आली आहे. गोलरक्षक सुब्रतो पॉलचा भक्कम आधार संघाला आहे. तसेच, मॉरिट्झ, बुस्तास, लाल्टे यांच्या माध्यमातून मध्य आणि आघाडीची फळी सामन्यावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करेल. गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र डर्बीमध्ये पुण्यातील सामन्यात यजमानांनी २-० असा विजय नोंदवला होता. मुंबईतील सामन्यात पुण्याचा १-५ असा धुव्वा उडाला होता.
पुण्याची सहमालकी हृतिक रोशनकडे आहे, तर मुंबईची रणबीर कपूरकडे. यंदाच्या हंगामातील या पहिल्याच सामन्याला हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच, प्रेक्षकांना मैदानातील मार्की खेळाडूंबरोबरच मैदानाबाहेरदेखील हृतिक विरुद्ध रणबीर यांचा सामना पाहण्यास मिळेल. (क्रीडा प्रतिनिधी)