मुंबईची रेल्वेला धडक
By Admin | Updated: November 19, 2015 01:01 IST2015-11-19T01:01:03+5:302015-11-19T01:01:03+5:30
सामन्यावर पुर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर रेल्वेने बलाढ्य मुंबई विरुध्द घेतलेला निर्णय अखेर त्यांना महागात पडला. दुसऱ्या डावात ४ बाद ४०८ धावा काढून डाव घोषित

मुंबईची रेल्वेला धडक
मुंबई : सामन्यावर पुर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर रेल्वेने बलाढ्य मुंबई विरुध्द घेतलेला निर्णय अखेर त्यांना महागात पडला. दुसऱ्या डावात ४ बाद ४०८ धावा काढून डाव घोषित केलेल्या रेल्वेने यजमानांना विजयासाठी चौथ्या दिवशी २९५ धावांचे आव्हान दिले. मात्र खडूस वृत्तीसाठी प्रसिध्द असलेल्या मुंबईने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना अखिल हेरवाडकर, श्रेयश अय्यर आणि कर्णधार आदित्य तरे यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर रेल्वेला ६ विकेट्सने नमवले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विजय मिळवताना मुंबईने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटात ६ सामन्यांतून ३ विजय व ३ अनिर्णित अशा कामगिरीसह २६ गुणांची कमाई करत अग्रस्थान कायम राखले. त्याचवेळी रेल्वे संघाचा ७ सामन्यांतील हा सहावा पराभव ठरला. रेल्वे ६ गुणांसह ‘ब’ गटात तळाला आहे. या धमाकेदार विजयासह मुंबईने बाद फेरी गाठण्याच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. सौरभ वाकसकर आणि व्ही. चेलुवराज यांच्या शानदार शतकाच्या जोरावर रेल्वेने चौथ्या दिवशी १ बाद २८५ धावांवरुन सुरुवात करताना दुसरा डाव ४ बाद ४०८ धावांवर घोषित करुन धाडसी निर्णय घेतला. विशाल दाभोळकरने मुंबईकडून यशस्वी मारा करताना ११५ धावांत ३ बळी घेतले. पहिल्या डावात ७ बळी घेऊन मुंबईला धक्के देणाऱ्या कर्ण शर्माच्या फिरकीवर रेल्वेच्या आशा होत्या. कर्णला दुसऱ्या डावात २६ षटकांत ११० धावांच्या मोबदल्यात केवळ एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक
रेल्वे (पहिला डाव) : सर्वबाद २१७ धावा.
मुंबई (पहिला डाव) : सर्वबाद ३३१ धावा.
रेल्वे (दुसरा डाव) : सौरभ वाकसकर झे. अय्यर गो. दाभोळकर १८५, आशिष सिंग पायचीत गो. दाभोळकर ४४, व्ही. चेलुवराज नाबाद १३३, अक्षत पांड्ये झे. तरे गो. दाभोळकर ९, विवेक सिंग झे. यादव गो. लाड २६. अवांतर - ११. एकूण : १०४ षटकांत ४ बाद ४०८ धावा घोषित.
गोलंदाजी : धवल कुलकर्णी २२-७-६१-०; शार्दुल ठाकूर १९-५-७१-०; विशाल दाभोळकर २३-१-११५-३; जय बिस्त १९-२-७२-०; हरमीत सिंग १२-०-४०-०; सिध्देश लाड ५-०-२८-१; श्रेयश अय्यर ४-१-११-०.
मुंबई (दुसरा डाव) : अखिल हेरवाडकर झे. व गो. मिश्रा ७५, जय बिस्त झे. रावत गो. अनुरीत सिंग १०, श्रेयश अय्यर झे. विवेक सिंग गो. शर्मा ९१, सुर्यकुमार यादव झे. व गो. मिश्रा ३, आदित्य तरे नाबाद ७१, सिध्देश लाड नाबाद ४१. अवांतर - ४. एकूण : ६४ षटकांत ४ बाद २९५ धावा.
गोलंदाजी : अनुरीत सिंग ७-०-२९-१; अक्षत पांड्ये ३-०-२७-०; अर्णब नंदी १६-०-७२-०; कर्ण शर्मा २६-१-११०-१; सागर मिश्रा १२-०-५३-२.