निवृत्त सैनिकाचा मुलगा झाला ‘मुंबई श्री’
By Admin | Updated: February 27, 2017 04:30 IST2017-02-27T04:30:06+5:302017-02-27T04:30:06+5:30
अतुल आंब्रेने केवळ ५ महिन्यांमध्ये कठोर परिश्रम करून पीळदार शरीर कमावले आणि थेट प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’ किताबावर कब्जा केला

निवृत्त सैनिकाचा मुलगा झाला ‘मुंबई श्री’
रोहित नाईक, मुंबई
आर्थिक कमजोरीमुळे दोन वर्षांपासून शरीरसौष्ठवपासून दूर राहिलेल्या डोंबिवलीच्या अतुल आंब्रेने केवळ ५ महिन्यांमध्ये कठोर परिश्रम करून पीळदार शरीर कमावले आणि थेट प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’ किताबावर कब्जा केला. शनिवारी अंधेरी लोखंडवाला परिसरामध्ये झालेल्या या भव्यदिव्य स्पर्धेत अतुलचाच बोलबाला राहिला. निवृत्त सैनिकाचा पुत्र असलेल्या अतुलने कठोर परिश्रम आणि ऐनवेळी मिळालेली आर्थिक मदत या जोरावर बाजी मारली.
अतुलने याआधी ज्युनिअर स्पर्धेतून दिमाखात पदार्पण करत शरीरसौष्ठव स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली होती. २०१५ साली त्याने पदार्पणातच ‘ज्यु. मुंबई श्री’, ‘ज्यु. महाराष्ट्र श्री’ आणि ‘ज्यु. मिस्टर इंडिया’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धांत बाजी मारली. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला नाइलाजाने दोन वर्षे या खेळापासून दूर राहावे लागले.
अतुलचे वडील रवींद्र आंब्रे निवृत्त सैनिक असून, त्यांनी ३२ वर्षे देशाची सेवा केली आहे. विशेष म्हणजे कारगिल मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता. सध्या ते एका नामांकित कंपनीच्या सरक्षा विभागात कार्यरत असून, कंपनीचा पगार आणि सरकारकडून मिळणारे पेन्शन यावरच अतुलच्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे. अशा परिस्थितीमध्ये महिना ५० - ६० हजार रुपये खर्च आवश्यक असलेल्या या खेळामध्ये अतुलची मोठी कसरत होत आहे.
या एका कारणामुळेच मोठी क्षमता असूनही अतुलला नाइलाजास्तव या खेळापासून दूर व्हावे लागले. परंतु, सुजित नलावडे यांनी मोक्याच्या वेळी दिलेले आर्थिक पाठबळ आणि प्रशिक्षक संजय चव्हाण यांचे योग्य मार्गदर्शन या जोरावर अतुलने केवळ ५ महिन्यांमध्ये पीळदार शरीरयष्टी कमावताना बाजी मारली.
एकूण ८ वजनी गटांत झालेल्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेत ८५ किलोपेक्षा अधिक गटातून अतुल जेव्हा मंचावर आला, तेव्हाच प्रेक्षकांना यंदाचा विजेता मिळाला. अतुलची शरीरयष्टी एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूसारखी दिसत असल्याने सर्वच प्रतिस्पर्ध्यांमध्ये तो उठून दिसत होता. शिवाय आपल्याच वजनी गटात त्याने बलाढ्य नीलेश दगडेला नमवल्याने किताबी लढतीत त्याच्यासमोर कोणाचेही आव्हान नव्हते. स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान विलास घडवले याला मिळाला. तसेच, सकिंदर सिंगने प्रगतीकारक खेळाडू म्हणून छाप पाडली.
।अतुलच्या यशाचा मला व त्याच्या आईला खूप आनंद आहे. त्याने घेतलेले कष्ट शब्दांत व्यक्त करता येणार नाही. अतुलच्या यशामध्ये त्याचे प्रशिक्षक व पुरस्कर्ते यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय त्याला आमच्याहून अधिक मित्रांची साथ मिळाली.
- रवींद्र आंब्रे (अतुलचे वडील)
>४ महिन्यांपूर्वी हा ‘मुंबई श्री’ मारेल असे कोणीही सांगितले नसते. या स्पर्धेसाठी तो अगदी झपाटलेला होता. दोन वर्षांनी अतुल भारताचा अव्वल शरीरसौष्ठवपटू बनेल, फक्त त्याला आर्थिक मदतीची गरज आहे.
- संजय चव्हाण, प्रशिक्षक
वडील सैन्यात असताना माझ्याकडे जिमला जाण्यासाठी पैसेच नव्हते. त्या वेळी अक्षरश: रडलो होतो. तेव्हा आईने शेजाऱ्यांकडून पैसे घेऊन माझी फी भरली होती. आजच्या यशानंतर आई - वडील दोघेही खूश आहेत. त्यांनी जो काही पाठिंबा दिला त्यामुळेच हे शक्य झाले. हे यश माझ्या एकट्याचे नसून माझे दोन्ही भाऊ आणि मित्र यांचेही आहे.
- अतुल आंब्रे
>गटनिहाय निकाल
५५ किलो : १. सिद्धेश सकपाळ (परब फिटनेस), २. नितीन शिगवण (वक्रतुंड जिम), ३. देवचंद गावडे (परब फिटनेस).
६० किलो : १. उमेश गुप्ता (क्रिएटर), २. तेजस भालेकर (परब फिटनेस), ३. उमेश पांचाळ (आर.एम. भट).
६५ किलो : १. बप्पन दास (आर. के. एम. जिम ), २. सिद्धेश धनावडे (परब फिटनेस), ३. प्रदीप झोरे (माय फिटनेस).
७० किलो : १. विलास घडवले (बॉडी वर्पशॉप), २. प्रतीक पांचाळ (परब फिटनेस), ३. विकास सकपाळ ( बालमित्र जिम).
७५ किलो : १. सौरभ साळुंखे (आर. एम. भट), २. सुशील मुरकर (आर. के. एम.),
३. संतोष भरणकर (परब फिटनेस).
८० किलो : १. सुशांत रांजणकर (आर. एम. भट),
२. स्वप्निल मांडवकर (फॉरच्युन फिटनेस), ३. रमेश दिब्रेटो (बॉडी वर्पशॉप).
८५ किलो : १. सकिंदर सिंग (आर. के. एम.), २. देवेंद्र वणगेकर (बॉडी वर्पशॉप), ३. मयूर घरत (माँसाहेब ).
८५ किलोवरील : १. अतुल आंब्रे (हकर््युलस फिटनेस),
२. नीलेश दगडे (परब फिटनेस), ३. अरुण नेवरेकर (स्टील बॉडी).