राष्ट्रीय पिकलबॉलसाठी मुंबई सज्ज

By Admin | Updated: June 10, 2015 01:10 IST2015-06-10T01:10:04+5:302015-06-10T01:10:04+5:30

आगामी २६ ते २८ जूनदरम्यान हरियाणा (पानीपत) येथील जी. डी. गोएंका पब्लिक स्कूल येथे रंगणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेसाठी मुंबईचा तगडा संघ निवडण्यात आला आहे.

Mumbai ready for national pickball | राष्ट्रीय पिकलबॉलसाठी मुंबई सज्ज

राष्ट्रीय पिकलबॉलसाठी मुंबई सज्ज


मुंबई : आगामी २६ ते २८ जूनदरम्यान हरियाणा (पानीपत) येथील जी. डी. गोएंका पब्लिक स्कूल येथे रंगणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेसाठी मुंबईचा तगडा संघ निवडण्यात आला आहे. गेल्या दोन स्पर्धांत विजेतेपद थोडक्यात निसटल्याने यंदा कोणत्याही परिस्थितीमध्ये बाजी मारायचीच, असा निर्धार मुंबईकरांनी केला आहे.
नुकताच अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलामध्ये झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून ५ पुरुष व ५ महिला असा १० खेळाडूंचा मुंबईचा बलाढ्य संघ निवडण्यात आला आहे. एकेरीच्या पुरुष व महिला गटात अनुक्रमे अनिकेत दुर्गावळी व एकता सकपाळ यांच्याकडून मुंबईला पदकांची अपेक्षा आहे. तसेच दुहेरी गटामध्ये मुंबईच्या खेळाडूंची एकूण तयारी पाहून त्यांना पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे नसेल, असे भाकीत मुंबई उपनगर जिल्हा पिकलबॉल असोसिएशनचा सचिव चेतन काते याने केले आहे. संघातील इतर खेळाडूदेखील कठोर मेहनत घेत असल्याने यंदा मुंबईच्या विजेतेपदाची प्रतीक्षा नक्कीच संपेल, असेही चेतनने सांगितले.
आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या (आयपा) वतीने या स्पर्धेचे पहिल्यांदाच मुंबईबाहेर आयोजन होत असल्याने स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे.
देशभरातून अव्वल ८ संघांनी आपला सहभाग निश्चित केला असून यामध्ये मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार, पाँडेचेरी व राजस्थान या संघांचा समावेश आहे. शिवाय जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांचे विशेष निर्देशक आपल्या काही खेळाडूंसोबत या वेळी पिकलबॉलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होतील.
दरम्यान, स्पर्धेतील संभाव्य विजेत्यांचा विचार केल्यास मुंबई शिवाय गतविजेत्या राजस्थानला सर्वाधिक पसंती मिळत आहे. गतस्पर्धेत राजस्थानने बाजी मारताना मुंबईला गुणांच्या आधारे मागे टाकले होते. त्यामुळे मुंबई या वेळी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल.
तसेच स्पर्धेतील ‘डार्क हॉर्स’ असलेले बिहार व पाँडेचेरी यांच्या कामगिरीकडे देखील विशेष लक्ष असेल. शिवाय हरियाणाच्या अव्वल खेळाडूंना घरच्या मैदानाचा फायदा होणार असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका मुंबईकरांना बसू शकतो. (क्रीडा प्रतिनिधी)

मुंबई संघ
(पुरुष) : एकेरी - अनिकेत दुर्गावळी, आशिष महाजन. दुहेरी - मनीष राव, सचिन मांजरेकर. मिश्र दुहेरी - अनिकेत दुर्गावळी.
(महिला) : एकेरी - एकता सकपाळ, कादंबरी पाटील. दुहेरी - प्रीती गुप्ता, अंकिता बालेकर. मिश्र दुहेरी - भाग्यश्री भंडारी.

Web Title: Mumbai ready for national pickball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.