ग्लॅमरस बॉडीबिल्डिंगसाठी मुंबई सज्ज

By Admin | Updated: November 18, 2015 01:59 IST2015-11-18T01:59:58+5:302015-11-18T01:59:58+5:30

शरीरसौष्ठवप्रेमींसाठी आगामी डिसेंबर महिना पर्वणीचा ठरणार आहे. १६ आणि १७ डिसेंबरला मुंबईमध्ये प्रतिष्ठेच्या तळवलकर्स क्लासिक या ग्लॅमरस बॉडीबिल्डिंग स्पर्धेचा थरार रंगणार

Mumbai ready for glamorous bodybuilding | ग्लॅमरस बॉडीबिल्डिंगसाठी मुंबई सज्ज

ग्लॅमरस बॉडीबिल्डिंगसाठी मुंबई सज्ज

मुंबई : शरीरसौष्ठवप्रेमींसाठी आगामी डिसेंबर महिना पर्वणीचा ठरणार आहे. १६ आणि १७ डिसेंबरला मुंबईमध्ये प्रतिष्ठेच्या तळवलकर्स क्लासिक या ग्लॅमरस बॉडीबिल्डिंग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. निवडक ३० खेळाडूंना निमंत्रित केलेल्या या स्पर्धेत देशभरातील अव्वल शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करतील. विशेष म्हणजे या स्पर्धेद्वारे प्रथमच पुरुष व महिला खेळाडूंच्या मिश्र जोडीची स्पर्धाही रंगेल. त्यामुळेच यंदा स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे.
तब्बल १६.२५ लाखांची एकूण बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धा खुल्या गटात रंगणार असून, विजेत्या शरीरसौष्ठवपटूला रोख ५ लाख रुपयांची घसघसीत विजयी रक्कम मिळणार आहे. तसेच अंतिम फेरीसाठी अव्वल १० शरीरसौष्ठवपटूंची निवड करण्यात येणार असून, प्रत्येक क्रमांकावरील खेळाडूला रोख रक्कम जिंकण्याची संधी असेल. त्याचप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधलेल्या मिश्र जोडीच्या लढतीसाठी ६ जोड्यांनी सहभाग निश्चित केला असून, विजयी जोडीला रोख १ लाख रुपये जिंकण्याची संधी असेल.
इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होत असलेल्या या स्पर्धेत गतविजेता मुरली कुमार, मिस्टर आशिया सुनीत जाधव, जगदीश लाड, विपीन पीटर, बॉबी सिंग आणि बी. महेश्वरन यांसारखे बलाढ्य व कसलेले शरीरसौष्ठवपटू विजेतेपदासाठी आपले कसब पणास लावतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह ओडिसा, दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथील बलाढ्य शरीरसौष्ठवपटूंचाही स्पर्धेत सहभाग असल्याने स्पर्धेत मोठी चुरस रंगेल.

Web Title: Mumbai ready for glamorous bodybuilding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.