मुंबई पोलीस जिमखाना महिला संघाचे शानदार विजेतेपद
By Admin | Updated: November 3, 2016 04:13 IST2016-11-03T04:13:52+5:302016-11-03T04:13:52+5:30
पोलीस महिला जिमखाना संघाने अमर हिंद मंडळाचा १५-१२ असा पराभव करुन मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद महिला गट कबड्डी स्पधच्या जेतेपदावर कब्जा केला

मुंबई पोलीस जिमखाना महिला संघाचे शानदार विजेतेपद
मुंबई : चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पोलीस महिला जिमखाना संघाने अमर हिंद मंडळाचा १५-१२ असा पराभव करुन मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद महिला गट कबड्डी स्पधच्या जेतेपदावर कब्जा केला. तसेच, तृतीय श्रेणी स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेत धारावीच्या चॅलेंजर बॉईज कबड्डी संघाने महापुरुष क्रीडा मंडळ संघाला २७-२४ अशी धूळ चारत बाजी मारली.
मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या वतीने वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात शिरीषा शेलार व भक्ती इंदुलकरच्या खेळामुळे मुंबई पोलीस महिला जिमखानाने पहिल्या डावात ७-४ अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर अमर हिंदच्या तेजस्विनी पोटे व प्राजक्ता कांबळी यांनी दमदार खेळ करत सामन्यात रंग भरले. मात्र मध्यांतराला घेतलेली आघाडी निर्णायक ठरवताना मुंबई पोलीस महिला जिमखानाने विजेतेपदावर नाव कोरले.
दुसरीकडे, तृतीय श्रेणी पुरुष गटात चॅलेंजर बॉईज संघाने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना महापुरुष क्रीडा मंडळाला २७-२४ असे नमवले. इमानुवेलेच्या आक्रमक चढाया व सरावनन स्वरूपाच्या दमदार पकडीच्या जोरावर चॅलेंजर बॉईज संघाने १५-८ अशी आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवली.
मात्र, मध्यातंरानंतर महापुरुष क्रीडा संघाच्या विवेक खामकर आणि निकेश पाटील यांनी तुफानी खेळ करताना सामन्याचे पारडे फिरवले. परंतु, दडपणाखाली झालेल्या चुकांचा फटका बसल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)