मुंबई-यूपी सामना अनिर्णित
By Admin | Updated: November 11, 2015 01:57 IST2015-11-11T01:57:53+5:302015-11-11T01:57:53+5:30
हिमांशू असनोरा आणि उमंग शर्मा यांच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने फॉलोआॅन मिळाल्यानंतरही यजमान मुंबईविरुद्धचा रणजी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले

मुंबई-यूपी सामना अनिर्णित
मुंबई : हिमांशू असनोरा आणि उमंग शर्मा यांच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने फॉलोआॅन मिळाल्यानंतरही यजमान मुंबईविरुद्धचा रणजी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. उत्तर प्रदेशचा पहिला डाव ४४० धावांत गुंडाळलेल्या मुंबईने त्यांना फॉलोआॅन दिला खरा, मात्र यानंतर उत्तर प्रदेशने संयमी व चिवट फलंदाजी करताना अखेरच्या दिवशी केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात १४० धावा काढून सामना अनिर्णित राखला. यासह मुंबईने ‘ब’ गटात पाच सामन्यांतून २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून उत्तर प्रदेश संघ पाच सामन्यांतून १४ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी ६१० धावांचा डोंगर उभारल्यानंतर पाहुण्यांना ४४० धावांत गुंडाळून त्यांच्यावर फॉलोआॅन लादला. यानंतर मुंबईने झटपट पहिला बळी घेत उत्तर प्रदेशवर दबाव आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र पहिल्या डावात ९२ धावांची झुंजार खेळी केलेल्या हिमांशू असनोरा याने पुन्हा एकदा मुंबईकरांना दमवले आणि उमंग शर्मासह दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १२८ धावांची भागीदारी करून सामना अनिर्णित राखण्यात मोलाचे योगदाने दिले. असनोराने १३६ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूने उमंग शर्माने १०९ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ६२ धावा फटकावून असनोराला चांगली साथ दिली. विशाल दाभोळकरने सुरुवातीला सलामीवीर एकलव्य द्विवेदीला केवळ ६ धावांवर बाद करून मुंबईला शानदार सुरुवात करून दिली होती. मात्र यानंतर असनोरा - शर्मा यांनी वर्चस्व राखले.
तत्पूर्वी ५ बाद ३५० या धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाची सुरुवात केलेल्या उत्तर प्रदेशला फॉलोआॅन टाळण्यात अपयश आले. दिवसभरात केवळ ९० धावांची भर काढून संपुर्ण संघ बाद झाला. एकलव्य द्विवेदी - पीयूष चावला ही तिसऱ्या दिवसाची नाबाद जोडी अभिषेक नायरने फोडल्यानंतर उत्तर प्रदेशच्या डावाला गळती लागली. द्विवेदी ६६ धावांवर बाद झाला. तर यानंतर नायरने चावलाला देखील बाद करुन मुंबईचा मार्ग मोकळा केला. चावलाने १०९ चेंडूत १२ चौकार व एका षटकारासह ८४ धावा केल्या. भुवनेश्वर कुमार (२२), प्रवीण कुमार (६) आणि अंकित राजपूत (३) हे फारशी चमक न दाखवता बाद झाल्याने उत्तर प्रदेशला फॉलोआॅनच्या नामुष्कीस सामोरे जावे लागले. उत्तर प्रदेशला फॉलोआॅन देताना मुंबईकडून विशाल दाभोळकर आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी ४ बळी घेत निर्णायक कामगिरी केली. तर बलविंदर संधूने एक बळी घेतला.
धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १५३ षटकांत ९ बाद ६१० धावा घोषित.
उत्तर प्रदेश (पहिला डाव) : १५१ षटकांत सर्वबाद ४४० धावा.
उत्तर प्रदेश (दुसरा डाव) : एकलव्य द्विवेदी पायचीत गो. दाभोळकर ६, हिमांशू असनोरा नाबाद ६८, उमंग शर्मा नाबाद ६२. अवांतर - ४. एकूण : ४५ षटकांत १ बाद १४०
गोलंदाजी : विशाल दाभोळकर १०-२-३०-१; अभिषेक नायर ४-२-४-०; शार्दुल ठाकूर ४-२-३-०; सिद्धेश लाड ९-२-२६-०; रोहित शर्मा ४-०-१४-०; श्रेयश अय्यर ९-०-४०-०; सूर्यकुमार यादव ५-०-१९-०.