मुंबई इंडियन्सची दमदार मजल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 00:08 IST2015-05-02T00:08:32+5:302015-05-02T00:08:32+5:30
अंबाती रायडूच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर (नाबाद ५३ धावा, २७ चेंडू सात चौकार, तीन षटकार) मुंबई इंडियन्सने आयपीएल-८ मध्ये शुक्रवारी पाच

मुंबई इंडियन्सची दमदार मजल
रोहित नाईक, मुंबई
अंबाती रायडूच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर (नाबाद ५३ धावा, २७ चेंडू सात चौकार, तीन षटकार) मुंबई इंडियन्सने आयपीएल-८ मध्ये शुक्रवारी पाच गड्यांच्या मोबदल्यात १८७ पर्यंत आव्हानात्मक मजल गाठली. यापूर्वी राजस्थानविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केल्यानंतर डावाची अखेरही झकास केली. रायडूने २७ चेंडूत ५३ तर पोलार्डने १४ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून राजस्थानचा कर्णधार शेन वॉटसनने यजमानांना प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. मुंबईने देखील या संधीचा पुरेपूर फायदा उचलताना झोकात सुरुवात केली. टिम साऊदीच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सिमेन्सचा झेल यष्टीरक्षक संजू सॅमसन याने सोडला. ही चूक राजस्थानला महागात पडली. सिमेन्सने देखील यानंतर साऊदीला पुढे येऊन खणखणीत चौकार लगावत आपला इरादा स्पष्ट केला.
धवल कुलकर्णीने पाचव्या षटकांत पार्थिवचा झेल स्वत: टिपत मुंबईला पहिला धक्का दिला. दरम्यान मुंबईने सातव्या षटकापर्यंत अर्धशतक गाठले. सिमन्सने उन्मुक्त चंदच्या सोबतीने दहा षटकापर्यंत ७३ पर्यंत मजल गाठली तोच अंकित शर्माने त्याला पायचित केले. सिमन्सने ३१ चेंडूंत चार चौकार व एका षटकारासह ३८ आणि पार्थिवने १४ चेंडूत पाच चौकारासह २३ धावा केल्या. उन्मुक्त चंद साऊदीच्या चेंडूवर बिन्नीकडे झेल देत परतला.
कर्णधार रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करीत धावा खेचण्यावरही भर दिला. रोहित आक्रमक वाटत होता पण राजस्थानच्या गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा आणि साजेसे क्षेत्ररक्षण यामुळे मुंबईच्या फलंदाजांना फारशी मोकळीक मिळत नव्हती. १३ व्या षटकाअखेर मुंबईच्या तीन बाद १०० धावा फळ्यावर लागल्या.
स्टुअर्ट बिन्नीच्या पुढच्या षटकार रोहितने चौकार आणि रायडूने षटकार खेचल्यानंतर १५ वे षटक टाकण्याची जबाबदारी धवल कुलकर्णीकडे आली. त्याच्या चौथ्या चेंडूवर रोहितने षटकार मारला.
पुढचा चेंडू फ्लिक करण्याच्या नादात शॉर्ट फाईन लेगवर अंकित शर्मा याने रोहितचा (२१ चेंडूत २७ धावा) सुरेख झेल टिपला. डावाच्या अखेरच्या तीन षटकांत मुंबईकडून पोलार्ड आणि रायडू यांनी ४९ धावा वसूल केल्या. रायडू अधिक आक्रमक होता. पोलार्ड २४ धावा काढून झेलबाद झाला. हरभजन खाते न उघडता नाबाद राहिला.