मुंबई हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात
By Admin | Updated: October 22, 2015 01:00 IST2015-10-22T01:00:28+5:302015-10-22T01:00:28+5:30
रणजी ट्रॉफी ‘ब’ गटात मुंबई सलग तिसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने बडोदा विरुध्द मैदानात उतरेल. त्याचवेळी घरच्या मैदानावर मुंबईला रोखण्यासाठी बडोदा

मुंबई हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात
मुंबई : रणजी ट्रॉफी ‘ब’ गटात मुंबई सलग तिसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने बडोदा विरुध्द मैदानात उतरेल. त्याचवेळी घरच्या मैदानावर मुंबईला रोखण्यासाठी बडोदा संघाने कंबर कसली आहे.
सलामीच्या सामन्यात आंध्र प्रदेश विरुद्धचा सामना अनिर्णितआवस्थेत सुटल्यानंतर मुंबईकरांनी पंजाबचा दणदणीत पराभव केला. तर यानंतर गतउपविजेत्या तामिळनाडूचा अवघ्या एका विकेटने पराभव करुन स्पर्धेत विजयी कूच केली. हे दोन्ही विजय घरच्या मैदानावर मिळवले असल्याने मुंबईकरांची विजयी कूच कायम राखण्यासाठी खरी कसोटी लागेल.
दुसऱ्या बाजूला बडोदा संघाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात तामिळनाडू विरुध्द पराभव स्वीकारल्यानंतर बडोदाने दुसऱ्या सामन्यात रेल्वेला एक डाव व ११३ धावांनी धडक दिली. तर आंध्र प्रदेश विरुध्दचा तिसरा सामना अनिर्णित अवस्थेत सुटला. ‘ब’ गटात बलाढ्य मुंबईने वर्चस्व राखताना ३ सामन्यांतून २ विजय व एक अनिर्णित अशा कामगिरी करीत सर्वाधिक १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर बडोदाने ३ सामन्यांतून एक विजय, एक पराभव व एक अनिर्णित अशा कामगिरीसह ८ गुण कमावले असून ते पाचव्या स्थानी आहेत.
मुंबईच्या फलंदाजीची मदार कर्णधार आदित्य तरे, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, अखिल हेरवाडकर व सिध्देश लाड यांच्यावर असेल. त्याचवेळी शार्दुल ठाकूर, विशाल दाभोळकर, धवल कुलकर्णी आणि बलविंदर संधू यांच्यावर मुंबईच्या गोलंदाजीची भिस्त असेल.
मुंबई : आदित्य तरे (कर्णधार), अखिल हेरवाडकर, श्रीदीप मांगेला, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, अभिषेक नायर, सिध्देश लाड, निखिल पाटील (ज्यू.), धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, बलविंदर सिंग संधू (ज्यू.), विशाल दाभोळकर, अभिषेक राऊत, बद्रे आलम आणि हरमीत सिंग.
बडोदा : वाघमोडे (कर्णधार), भार्गव भट्ट, गगनदीप सिंग, हार्दिक पंड्या, मोनील पटेल, युसुफ पठाण, हितेश सोळंकी, मुर्तुजा वोहरा, दीपक हुडा, केदार देवधर, सागर मंगलोरकर, भार्गव पटेल, बाबासफी पठाण, पीनल शाह आणि स्वप्नील सिंग.