नवी दिल्ली : बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आयपीएल फिक्सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आपला बचाव करताना त्यांच्याविरुद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात न्यायमूर्ती मुकुल मुद्गल समितीच्या अहवालावर सुनावणी करीत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीमध्ये श्रीनिवासन यांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, ‘‘श्रीनिवासन यांना जावई व चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन यांच्याबाबतच्या प्रश्नांवर उत्तर देण्याची गरज आहे.’’मुद््गल समितीच्या अहवालामध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मयप्पनचा समावेश असल्याचा उल्लेख आहे. न्यायालयाने बीसीसीआयला आयपीएलच्या आर्थिक संकल्पनेची विस्तृत माहिती देण्यास बजाविले होते. न्यायालयाने बोर्डाला लीगमध्ये खेळाडूंची विक्री व फ्रॅ न्चायझीच्या कमाईबाबत विचारणा केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. श्रीनिवासन यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले की, ज्या वेळी मला जावई मयप्पनवरील आरोपांची माहिती मिळाली त्या वेळी मी ताबडतोब त्याच्याविरुद्ध कारवाई केली. बीसीसीआयने मयप्पन व राज कुंद्राविरुद्ध तक्रार दाखल केली.पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयात श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोनदा आयपीएलचे जेतेपद पटकाविणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघावर कुणाचे नियंत्रण आहे? याची माहिती मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, श्रीनिवासन सीएसकेचे मालक असल्यामुळे स्पर्धा नि:पक्षपणे आयोजित करण्यास अडथळा निर्माण झाला असावा. सीएसकेवर ताबडतोब निलंबनाची कारवाई करण्यात यावी. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात उल्लेख असलेल्या व्यक्तींना वगळून बीसीसीआयची नव्याने निवडणूक घेण्यात यावी. बीसीसीआयची वार्षिक आमसभा १७ डिसेंबरला होणार असून, त्यात श्रीनिवासन यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
‘श्रीनिं’ची मुजोरी कायम
By admin | Updated: December 2, 2014 01:44 IST