श्रीनिवासनसाठी चालढकल

By Admin | Updated: September 8, 2014 03:50 IST2014-09-08T03:50:11+5:302014-09-08T03:50:11+5:30

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना वेळ मिळावा, यासाठी बीसीसीआयने आज, रविवारी सदस्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीमध्ये वार्षिक बैठक (एजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

Movement for Srinivasan | श्रीनिवासनसाठी चालढकल

श्रीनिवासनसाठी चालढकल

चेन्नई : टीकाकारांचे लक्ष्य ठरलेले बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना वेळ मिळावा, यासाठी बीसीसीआयने आज, रविवारी सदस्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीमध्ये वार्षिक बैठक (एजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
एजीएमबाबत चर्चा करण्यासाठी या अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या मुकुल मुद््गल समितीतर्फे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम अहवाल सोपविला जात नाही तोपर्यंत एजीएम स्थगित करण्यात यावी, असे मत बैठकीमध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी व्यक्त केले. बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक २६ सप्टेंबरला बोलविण्यात आलेली आहे. त्यामुळे एजीएम ३० सप्टेंबर या निर्धारित तारखेला होण्याची शक्यता नाही. नियमानुसार दोन्ही बैठकांमध्ये किमान तीन आठवड्यांचे अंतर असणे आवश्यक आहे.
आजच्या बैठकीला श्रीनिवासन प्रामुख्याने उपस्थित होते. त्यात १८ संलग्न संस्थांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष सहभागी झाले होते, तर अन्य तीन संलग्न संस्थांचे प्रतिनिधी टेलिकॉन्फरसच्या माध्यमातून सहभागी झाले. टेलिकॉन्फरसच्या माध्यमातून सहभागी झालेल्या सदस्यांमध्ये अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव यांचा समावेश आहे. यादव हैदराबाद क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करतात.
बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले, ‘आता एजीएम ३० सप्टेंबरला आयोजित होण्याची कुठलीच शक्यता नाही. आजच्या बैठकीमध्ये जवळजवळ २० सदस्य सहभागी झाले होते. त्यामुळे ३१ संलग्न सदस्य असलेल्या या संघटनेमध्ये श्रीनिवासन यांना बहुमत असल्याचे सिद्ध होते.’
बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या अन्य निर्णयांमध्ये विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेतील पाचवा वन-डे आता २० आॅक्टोबरला कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही लढत १७ आॅक्टोबरला कटकमध्ये खेळली जाणार होती. २२ आॅक्टोबरला आयोजित टी-२० सामन्याचे यजमानपद कटकला बहाल करण्यात आले. (वृत्तसंस्था)
विंडीज संघाच्या सहा आठवड्यांच्या दौऱ्याचा प्रारंभ पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. या मालिकेला ८ आॅक्टोबरला कोची येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीने सुरुवात होणार आहे. एकमेव टी-२० आंतरराष्टीय सामन्यानंतर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला ३० आॅक्टोबरपासून हैदराबाद येथे प्रारंभ होणार आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले की, बोर्डाच्या सदस्यांनी नवनियुक्त संघाचे संचालक रवी शास्त्री यांचे अभिनंदन केले. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका जिंकली. याव्यतिरिक्त बीसीसीआयने वार्षिक मन्सूर अली पटोदी स्मृती व्याख्यान कोलकातामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Movement for Srinivasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.