एमआयजीचे शानदार विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:24 IST2015-12-28T03:24:01+5:302015-12-28T03:24:01+5:30

आकाश पारकरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबचा ११८ धावांनी धुव्वा उडवून ६८व्या पोलीस शिल्ड क्रिकेट चषकावर नाव कोरले

MIG's glorious title | एमआयजीचे शानदार विजेतेपद

एमआयजीचे शानदार विजेतेपद

मुंबई : आकाश पारकरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबचा ११८ धावांनी धुव्वा उडवून ६८व्या पोलीस शिल्ड क्रिकेट चषकावर नाव कोरले. विजेत्यांना भारताचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
२४ ते २६ डिसेंबर अशा तीनदिवसीय अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून नॅशनल क्लबने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अडखळत्या सुरुवातीनंतर आकाश पारकरच्या शतकी खेळीच्या जोरावर एमआयजीने पहिल्या डावात
९ गड्यांच्या मोबदल्यात ३९१ धावांचा डोंगर उभारला. आकाशने १४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १२७ धावा केल्या. गौरव जठारने २९ चेंडूंत ५१ धावांची खेळी करून त्याला योग्य साथ दिली. प्रत्युत्तरात नॅशनल क्लबच्या फलंदाजांनी एमआयजीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. ५१व्या षटकात १९९ धावा करून संपूर्ण संघ तंबूत परतला. एमआयजीच्या आकाश आणि विनीत धुळप यांच्या भेदक माऱ्यापुढे नॅशनलची फलंदाजी ढेपाळली. आकाशने ४ बळी तर विनीतने ३ बळी घेतले. दुसऱ्या डावात एमआयजीने ४० षटकांत ७ बाद २४३ धावांवर डाव घोषित केला आणि नॅशनलला विजयासाठी ४३६ धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. नॅशनलच्या सलामी जोडीने धावफलक हलता ठेवला. सलमान अहमदने १३९ धावांची खेळी केली. पण दुसऱ्या बाजूने गडी बाद होत असल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली. अखेर एमआयजीने नॅशनलला ३१७ धावांत गुंडाळले.

Web Title: MIG's glorious title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.