बलाढ्य मुंबईचा यूपीला दणका

By Admin | Updated: November 17, 2016 03:31 IST2016-11-17T03:31:02+5:302016-11-17T03:31:02+5:30

प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पण करणारा आदित्य धुमाळ (५/५३) आणि सध्या फॉर्ममध्ये असलेला विशाल दाभोळकर (४/४३) यांच्या भेदक

The mighty UPA of the mighty Mumbai | बलाढ्य मुंबईचा यूपीला दणका

बलाढ्य मुंबईचा यूपीला दणका

म्हैसूर : प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पण करणारा आदित्य धुमाळ (५/५३) आणि सध्या फॉर्ममध्ये असलेला विशाल दाभोळकर (४/४३) यांच्या भेदक फिरकीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी ट्रॉफीच्या ‘अ’ गटात दणदणीत विजय मिळवताना, उत्तर प्रदेशचा १२१ धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने दिलेल्या २९५ धावांचा पाठलाग करताना, उत्तर प्रदेशचा डाव १७३ धावांत संपुष्टात आला.
या शानदार विजयासह ‘अ’ मुंबईने सर्वाधिक २५ गुणांसह पुन्हा एकदा अग्रस्थानी झेप घेतली आहे. मुंबईने पाच सामन्यांतून तीन विजय मिळवले आहेत. त्याच वेळी उत्तर प्रदेशचा सहा सामन्यांतून हा चौथा पराभव ठरला. त्यांच्या खात्यात केवळ चार गुण असून, गटात ते आठव्या स्थानी आहेत.
मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशची फलंदाज ढेपाळले. युवा गोलंदाज धुमाळने स्वप्नवत पदार्पण करताना, उत्तर प्रदेशच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. त्याने ५३ धावांत अर्धा संघ बाद करून उत्तर प्रदेशचे कंबरडे मोडले, तर दाभोळकरनेदेखील ४३ धावांत ४ बळी घेत, त्याला चांगली साथ दिली.
सलामीवीर शिवम चौधरी याने १०३ चेंडूत ७ चौकारांसह ५० धावांची खेळी करून यूपीकडून एकाकी लढत दिली. समर्थ सिंगने ४२ धावांची संयमी खेळी केली. या दोघांच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
अखेरच्या दिवशी १ बाद ४३ धावांवरून सुरुवात केलेल्या यूपीचा डाव फारवेळ चालला नाही. शिवम व समर्थ या जोडीने ८१ धावांची भागीदारी करून संघाला सावरले होते. मात्र, दोघेही ठरावीक अंतराने बाद झाल्यानंतर, केवळ ४७ धावांत उर्वरित ७ बळी गेल्याने, यूपीचा डाव झटपट संपुष्टात आला. मुंबईच्या दोन्ही डावात ‘नर्व्हस नाइंटी’चा शिकार ठरलेल्या सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून निवडले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The mighty UPA of the mighty Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.