बॉक्सिंग प्रशिक्षणाची पद्धत भारतात अजून मागास
By Admin | Updated: November 21, 2014 00:21 IST2014-11-21T00:21:30+5:302014-11-21T00:21:30+5:30
भारतातील बॉक्सिंग प्रशिक्षणाची पद्धत इतर देशांच्या तुलनेत अजूनही मागासलेली आहे. एक प्रशिक्षक ५० ते ६० खेळाडूंना एकाच वेळी प्रशिक्षण देतो

बॉक्सिंग प्रशिक्षणाची पद्धत भारतात अजून मागास
स्वदेश घाणेकर, मुंबई
भारतातील बॉक्सिंग प्रशिक्षणाची पद्धत इतर देशांच्या तुलनेत अजूनही मागासलेली आहे. एक प्रशिक्षक ५० ते ६० खेळाडूंना एकाच वेळी प्रशिक्षण देतो. याउलट इतर देशांमध्ये खेळाडूमागे एक प्रशिक्षक, अशी पद्धत आहे. अशीच पद्धत आपणही अवलंबविल्यास भारतात आणखी मेरी तयार होतील, असे स्पष्ट मत मेरी कोमचा पती के. ओन्लेर याने मांडले.
पाच वेळेची जगज्जेती, आॅलिम्पिक व आशियाई सुवर्णपदक विजेती एम. सी. मेरी कोमच्या यशामागे ओन्लेर खंबीरपणे उभा होता. मेरीने कोणत्या परिस्थितीशी झगडून हे यशोशिखर गाठले, याची जाण ओन्लेरला आहे आणि त्यामुळेच मेरी कोमच्या बॉक्सिंग अकादमीतून तो मेरीसोबत सर्वोत्तम बॉक्सर घडविण्यासाठी झटत आहे. या अकादमीतील खेळाडूंच्या निवडीपासून सरावापर्यंतची धावपळ ओन्लेर करतो.
अकादमीविषयी ओन्लेर म्हणाला, ‘‘२००६ मध्ये आम्ही ही अकादमी स्थापन केली. त्या वेळी मेरी पाच वेळेची जगज्जेतीही नव्हती. बॉक्सिंगसाठी लागणाऱ्या जागेपासून साहित्यापर्यंत जुळवाजुळव करताना आमची चांगलीच दमछाक झाली. स्वखर्चाने कित्येक वर्षे आम्ही ही अकादमी चालवली. मेरी कोमचा यशाचा आलेख चढता राहिल्यामुळे आणि ती प्रकाशझोतात आल्यानंतर २०११ मध्ये ‘स्पोटर््स अथॉरिटी आॅफ इंडिया’ने (साइ) आम्हाला मान्यता दिली. साइच्या योजनांमधून निधीही उपलब्ध होऊ लागला आणि त्यातूनच बॉक्सिंगसाठी आवश्यक साहित्यही आम्हाला मिळाले. पुढे क्रीडा मंत्रालयानेही निधी देण्यास सुरुवात केली. अनेकांचा पाठिंबा मिळत असला तरी भारतातील एकूणच प्रशिक्षण पद्धतीत बदल होणे अपेक्षित आहे. चीन, अमेरिका, कोरिया, थायलंड अशा अनेक देशांमध्ये मी फिरलो आहे आणि तेथे एका खेळाडूसाठी एक प्रशिक्षक, अशी पद्धत आहे. भारतात हे अशक्य आहे. येथे चांगल्या बॉक्सिंग प्रशिक्षकांची कमतरता असल्याने एक प्रशिक्षक एकाच वेळी ५०-६० खेळाडूंना शिकवतात. अशा परिस्थितीत चॅम्पियन घडणार कसे, असा सवाल ओन्लेर करतो. आमच्या अकादमीतही प्रत्येक खेळाडूमागे प्रशिक्षक देणे शक्य नाही.